Ambad Theft pudhari photo
जालना

Jalna Crime : किराणा दुकान फोडून लाखाचा ऐवज लंपास; तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद

शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीती, पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

अंबड : अंबड तालुक्यातील वडिगोद्री येथील वडिगोद्री-अंतरवाली सराटी मार्गावरील श्रीराम किराणा दुकान फोडून तीन अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. सोमवारी (ता. २३) मध्यरात्री घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी दुकानातील रोख रकमेसह काजू, बदाम, सिगारेट व तंबाखूजन्य साहित्य चोरून नेले.

विशेष म्हणजे, चोरट्यांनी दुकानाबाहेरील आणि आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह डीव्हीआरही चोरून नेला. मात्र, शेजारील दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत.

दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सर्वप्रथम दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला. त्यानंतर शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील रोख रक्कम आणि विक्रीसाठी ठेवलेले किराणा व सिगारेटचे साहित्य असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज घेऊन त्यांनी पोबारा केला.

दुकानमालक श्रीराम अशोकराव जाधव हे मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले असता शटर उचकटलेले दिसले. तपासणी केली असता ४० हजार रुपये रोख, सुमारे ३७ हजार रुपयांचे सिगारेट, बदाम व काजू असा एक लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.

गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल गुरले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच ठसेतज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करून तपासणी करण्यात आली. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT