Upper Dudhana Project overflows, Badnapur city's water problem of 25 villages solved
बदनापूर, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मोठा प्रकल्प म्हणुन ओळख असलेला सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला असून या प्रकल्पातील पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने दुधना नदीला पूर आला आहे.
बदनापूर शहर तसेच आजूबाजूच्या परिसरातील २० ते २५ गावांची तहान भागविणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरावा अशी आस परिसरातील गावकऱ्यांना लागलेली असते. त्यामुळे निश्चितच गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर या प्रकल्पातील पाण्याचा उपयोग रब्बी हंगामातील पिकांना देखील होणार आहे.
त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गदेखील समाधानी झाला असल्याचे बघायला मिळत आहे. मागच्या वर्षी या प्रकल्पामध्ये जेमतेम पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत होते. परंतु परतीच्या मुसळधार पावसामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरुन तलावातून पाणी ओसंडून वाहत होते. तसेच यावर्षी देखील जोरदार पावसाने हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असल्याने परिवारातील वर्षभरासाठी पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तलावातील पाणी बघण्यासाठी परिसरातील नागरिकांची देखील गर्दी होताना दिसून येत आहे.
परिसरातील गणपती विसर्जन देखील याच तलावात होत असते.. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये देखिल आता प्रसन्नतेने वातावरण बघायला मिळत आहे. तसेच बदनापूर तालुक्यातील मोठे आणि सुसज्ज असे देवस्थान म्हणून ओळख असलेल्या रेणुकामाता मंदिराच्या पायथ्याशी हा तलाव असल्याने मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची देखील या ठिकाणी गर्दी होताना दिसून येत आहे.