Unauthorized constructions that suffocate the city
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरात अतिक्रमणांचा विळखा इतका घट्ट झाला आहे की नदीनाले, ओढे, पाण्याचे नैसर्गिक प्रवाहच गायब झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने या अतिक्रमणांचे दुष्परिणाम उघड केले. शहरातील वसाहती, व्यापारी संकुले अक्षरशः पाण्याखाली गेली. नागरिक व व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान, महापालिकेने पावसाळापूर्वी चाळीस लाखांच्या तरतुदीतून शहरातील नालेसफाईंचे काम हाती घेतले होते. मात्र, तरी देखील भाग्यनगरसह रेल्वे स्थानक, हनुमान घाट, रमाईनगर आदींसह ठीक ठिकाणी पाणी तुंबले होते. पाण्याचा नीट निचरा न झाल्याने भोईपुरासह गांधीनगरमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नालेसफाईच्या कामावर संशय घेतल्या जात आहे. तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसाने जालना शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाची बोंबाबोंब केली.
अनेक व्यापारी संकुलांच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले. जुन्या-जालन्यातील अरुंद रस्त्यांपासून ते नवीन-जालन्यातील आधुनिक इमारतींपर्यंत सर्वत्र पाणीच पाणी दिसले. नाले व ओढ्यांचे नैसर्गिक रूप बदलून टाकले गेले आहे. कुठे नाले बुजवून बांधकामे उभी केली, तर कुठे मोठ्या ओढ्यांना छोट्या सिमेंट नाल्यात रूपांतरित केले. या अशास्त्रीय डिझाइनमुळे पावसाचे पाणी वाहण्याचा मार्ग बंद झाला. परिणामी पाणी रस्त्यांवर व घरे, दुकाने, संकुलात घुसले.
शहराच्या पायाभूत सुविधांची उघडपणे होणारी ही चेष्टा नागरिकांच्या जीवावर बेतणारी ठरत आहे. शहरातील पाण्याखाली गे-लेले रस्ते व संकुले प्रशासनाला जागं करणार का? हा खरा प्रश्न नागरिकांमध्ये गुंजू लागला आहे.
अतिक्रमणे, निमुळते रस्ते आणि सांडपाणी नाल्यांचा अभाव या सगळ्यावर महानगरपालिका प्रशासनाचे शून्य नियंत्रण असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. जर यावर नियंत्रण मिळवले नाही, तर पुढच्या पावसात शहराला आणखी भीषण परिस्थितीचा सामना करावा लागेल, याची भीती व्यक्त होत आहे.