

Income of two lakhs from Kantule cultivation
रवींद्र देशपांडे
भोकरदन : जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि धोका पत्कारण्याची तयारी या चतुःसूत्रीमुळे बदनापूर तालुक्यातील मेहुणो येथील शेतकऱ्याने १० गुंठ्यात दोन लाखांचे निव्वळ उत्पन मिळवले आहे. त्या शेतकऱ्याचे नाव दत्तात्रय नारायण जाधव असे आहे. त्यांनी कंटुलेची भाजी लागवड करुन शास्त्रशुध्द पध्दतीने शेती करुन तोट्यात जाणाऱ्या शेतीला नफ्याचा मार्ग दाखवला.
दत्तात्रय जाधव यांचे भोकरदन येथे संगीता कृषी सेवा केंद्र आहे. त्यांनी दहा गुंठे कंटुले भाजी लागवडीतून आतापर्यंत एक लाख रुपयाचा नफा मिळवला आहे. तर अजून उदलेल्या पिकातून एक लाख रुपयाचे उत्पन्न मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजेच या दहा गुंठे कंटुले लागवडीतून त्यांना दोन लाखाचे निव्वळ उत्पन्न मिळणार आहे.
दरम्यान, दत्तात्रय जाधव यांच्या कुटुंबाची मेहुना ता. बदनापूर येथे सात एकर शेत जमीन आहे. दत्तात्रय यांचे भाऊ विष्णू जाधव हे शेत जमीन कसतात. जमिनीत कोठे काय व कशी लागवड करायची या सर्व गोष्टींचे नियोजन दत्तात्रय जाधव हे करतात. ते सात एकर जमिनी मध्ये कापूस, मक्का व भाजीपाला अशी पिके घेतात. यावर्षी त्यांनी दहा गुंठ्यामध्ये कंटुल्यांची लागवड केली. दहा गुंठ्यामध्ये वालाची भाजी लागवड केली. कंटुले भाजी विक्री मधून त्यांना आतापर्यंत एक लाख रुपये मिळाले आहे. अजून एक लाख रुपये उत्पन्न मिळणे त्यांना अपेक्षित आहे.
कंटुले उत्तम प्रतीची असून वालाच्या भाजी मधूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळेल. दैनिक पुढारीशी बोलताना दत्तात्रय जाधव म्हणाले, की कंटुले ही बह गुणकारी व औषधी भाजी आहे. त्यामुळे या भाजीला बाजारात कधीही चांगल्या दराने मागणी असते. दहा गुंठे कंटोले लागवडीसाठी त्यांना चार हजार रुपये बियाणे तसेच तार व वेळू बांधणी, बुरशीनाशक, कीटकनाशक फवारणी यासाठी १६ हजार रुपये असा एकूण वीस हजार रुपये संपूर्ण खर्च आला. यापासून दोन लाख रुपयाचे उत्पन्न मिळणार आहे. कंटुले हे लागवडीनंतर ४५ दिवसांमध्ये तोडण्यासाठी येतात. एप्रिल मध्ये लागवड केलेली कंटुले जून मध्ये काढण्यासाठी येतात. यासाठी बाजारपेठ जालना व छत्रपती संभाजी नगर या ठिकाणीच उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.