धावडा येथील भाविक संगीता संजू सपकाळ व सुनिता महादेव सपकाळ Pudhari photo
जालना

Jalana News | पंढरपूरच्या चंद्रभागेत दोन महिला भाविकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; धावडा गावावर शोककळा

दोन्ही महिला भाविकांचे नातेवाईक, ग्रामस्‍थ तातडीने पंढरपूरकडे रवाना

पुढारी वृत्तसेवा

भोकरदन : तालुक्यातील धावडा येथील दोन महिला भाविकांचे पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने धावडा गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे. धावडा येथील बारा महिला व दोन पुरुष असे एकूण 14 जण पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी 18 जुलै रोजी फलटण बसने गेले होते.

18 जुलै रोजी रात्री त्यांनी तेथे मुक्काम केल्यानंतर 19 जुलै रोजी सकाळी सहा ते सात वाजे दरम्यान यांच्यामधील काही महिला पवित्र स्नानासाठी चंद्रभागा नदीवर गेल्या होत्या. चंद्रभागा नदीमध्ये 18 जुलै रोजी रात्री उजनी धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. याची कल्पना या भाविकांना नव्हती.

त्यामुळे धावडा येथील भाविक संगीता संजू सपकाळ वय 40 वर्ष या नदीमध्ये उतरताना जोरात असलेल्या प्रवाहामध्ये वाहू लागल्या. हे बघून त्यांच्यासोबत असलेल्या सुनिता महादेव सपकाळ वय 43 वर्ष यांनी त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या साडीचा पदर त्यांच्याकडे भिरकावला मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. संगीता यांना वाचविण्याच्या प्रयत्नात सुनीता ही पाण्यात पडल्या व त्या सुद्धा या जोरदार प्रवाहात वाहत गेल्या व या दोघींचाही मृत्यू झाला. या ठिकाणी कोणतीही आपत्कालीन व्यवस्था शासनाकडून नसल्याने आरडा ओरड होऊन परिसरातील नागरिक धावून आले व त्यांच्या मदतीने हे दोन मृतदेह काढण्यात आले. या महिलांप्रमाणेच इतरही भाविक या नदी प्रवाह वाहत गेल्याचा संशय यावेळी उपस्थित भाविकांनी व्यक्त केला.

या घटनेची माहिती धावडा गावात समजताच सदरील दोन्ही महिलांचे पती संजू व महादेव यांच्यासह काही ग्रामस्थ यांनी तातडीने पंढरपूर गाठले. मात्र या घटनेमुळे धावडा गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT