Water Theft : पाणीचोरी रोखण्यासाठी मनपाची दोन विशेष पथके file photo
जालना

Water Theft : पाणीचोरी रोखण्यासाठी मनपाची दोन विशेष पथके

जायकवाडी लाईनवर पेट्रोलिंग, दंडात्मक कारवाईही करणार

पुढारी वृत्तसेवा

Two special teams of the Municipal Corporation to prevent water theft

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जालना शहरातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्यावतीने धडक मोहीम उघडण्यात आली आहे. अवैध नळजोडणी, पाणीचोरी आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालीकेच्यावतीने दोन विशेष भरारी पथके गठीत करण्यात आली असुन पाण्याचा अपव्यय व पाणीचोरी करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जायकवाडी-जालना मुख्य लाईनवर पेट्रोलिंग तसेच जलाशयांतून पाणी उपसा करणाऱ्या अनधिकृत मोटारींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आला आहे.

जालना शहरातील नवीन जालना भागास पाणी पुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशात सध्या केवळ दोन फुट पाणी साठा आहे. हे पाणी आगामी दोन महीने पुरणार असल्याने आगामी दोन महिन्यानंतर नवीन व जुना जालन्यातील नागरिकांना केवळ जायकवाडी-जालना पाणी पुरवठा योजनेवरच अवलंबून रहावे लागणार आहे.

यावर्षी कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे जालना शहरात आगामी काही दिवसात तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. संभाव्य महानगरपालिका जालना शहर महानगरपालिका पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जालना शहर महानगरपालिका प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर व योग्य नियोजन करण्यासाठी तसेच पाणीगळती, अनधिकृत नळजोडण्या आणि पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार दोन विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पाणीचोरी व पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर आता थेट कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील पाणीपुरवठा व संभाव्य पाणीटंचाई संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शहरास होणारा पाणीपुरवठा, उपलब्ध जलसाठा आणि पाणी बचतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील पाणीगळती रोखणे, मुख्य जलवाहिनीवरील अवैध नळजोडण्या शोधणे तसेच मोती तलाव, मुक्तेश्वर तलाव व संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशय येथे थेट विद्युत मोटारी बसवून होणारी पाणीचोरी थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते.

या पथकामध्ये जुना जालना पाणीपुरवठा वितरण प्रमुख राजु मोरे, नवीन जालना पाणीपुरवठा प्रमुख तथा बोरींग विभाग प्रमुख लक्ष्मीकांत नाकाडे व त्यांचे सर्व लाईनमन यांचा समावेश आहे. हे पथक जालना-जायकवाडी मुख्य जलवाहिनीवर पेट्रोलिंग करून शेतकरी व नागरिकांनी घेतलेल्या अवैध नळजोडण्यांवर कारवाई करेल. तसेच मोती तलाव, मुक्तेश्वर तलाव व घाणेवाडी तलावावर बसवण्यात आलेल्या अनधिकृत विद्युत मोटारी जप्त करून संबंधितांना नोटिसा बजावण्याचे व विहिरी/हातपंप दुरुस्त करून नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे काम हे पथक करणार आहे.

नोडल अधिकारी राजेश बगळे यांच्या नेतृत्वाखालील या पथकात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अभियंते कार्यरत राहतील. हे पथक शहरातील पाणीगळती, अनधिकृत नळजोडण्या शोधून काढेल. तसेच वाहने धुणे, गुरे-जनावरे धुणे, रस्त्यावर पाणी टाकणे अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून कायदेशीर नोटिसा देईल.

...तर कठोर कारवाई करणार

कमी पावसामुळे पाणीसाठा मर्यादित असल्याने जालना शहरवासीयांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. नळाला तोट्या बसवून पाणी वाया जाण्यापासून वाचवावे, पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी अथवा रस्त्यावर शिंपडण्यासाठी करू नये. अधिकृत नळजोडणी घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे; अन्यथा अनधिकृत नळजोडणी व पाणीचोरी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT