जालन्यात वडाच्या झाडावर आयशर धडकून दोन ठार file photo
जालना

जालन्यात वडाच्या झाडावर आयशर धडकून दोन ठार

रस्ता चुकल्याने घात झाला, वडाचे झाड मुळासकट उखडले

पुढारी वृत्तसेवा

Two killed as Eicher vehicle hits banyan tree in Jalna

जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना शहरात सोमवारी (दि. ३०) मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. शिर्डीकडे जनावरांचा चारा घेऊन जाणारा भरधाव आयशर ट्रक रस्ता चुकल्याने शहरात शिरला आणि कन्हैयानगर ते सेंट मेरी रोडवरील एका जुन्या वडाच्या झाडाला जोरात धडकला. ही धडक एवढी भीषण होती की ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, यात चालक आणि एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे.

रस्ता चुकला अन काळ आला

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील मानकेश्वर येथील ट्रक चालक सुरेश पालवे (वय २८) हे जिंतूर येथील शेतकऱ्याचा ५ टन चारा घेऊन आयशर ट्रकने (क्र.-२२--३३७२) शिर्डीकडे निघाले होते. वाटेत जालना-मंठा रोडवरील एका हॉटेलवर थांबले असता, हॉटेल चालक बबलू नारायण लोंढे (रा. डुकरी पिंपरी, ता. जालना) हे देखील त्यांच्यासोबत ट्रकमध्ये बसले. मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास कन्हैयानगर चौफुलीवरून हायवेने जाण्याऐवजी हा ट्रक चुकून जालना शहराकडे वळाला आणि थेट वडाच्या झाडावर जाऊन धडकला.

झाड मुळासकट उखडले; क्रेनने काढले मृतदेह

या धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांची झोपमोड झाली. ट्रकच्या धडकेमुळे रस्त्याच्या कडेचे अजस्त्र वडाचे झाड मुळासकट उखडले गेले. अपघातानंतर ट्रकचा समोरील भाग पूर्णपणे दबल्या गेल्याने मृतदेह आत अडकले होते. स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र मृतदेह काढणे कठीण झाले होते. अखेर पहाटे ५ वाजता क्रेनच्या साहाय्याने ट्रकचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

अग्निशमन दलाकडून रस्ता मोकळा

अपघातातील दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घटनेनंतर जालना नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने सकाळी घटनास्थळी धाव घेत उन्मळून पडलेले झाड आणि ट्रकचे अवशेष हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. केवळ रस्ता चुकल्याने दोन निष्पाप जीवांना आपल्या प्राणास मुकावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT