Dharashiv Accident : थरकाप उडाला! सुसाट कारचे टायर फुटले अन् चहाच्या टपरीत घुसली; माजी नगरसेवकासह दोघांचा जागीच मृत्यू

Dharashiv Accident : थरकाप उडाला! सुसाट कारचे टायर फुटले अन् चहाच्या टपरीत घुसली; माजी नगरसेवकासह दोघांचा जागीच मृत्यू
Published on
Updated on

उमरगा (जि. धाराशिव) : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि. १०) दुपारी साडेतीनच्या सुमारास एका भीषण अपघाताने संपूर्ण उमरगा शहर हादरून गेले. देवदर्शन करून परतणाऱ्या एका भरधाव कारचे टायर फुटल्याने ती थेट रस्त्यालगतच्या चहाच्या टपरीत घुसली. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात उमरग्याचे माजी नगरसेवक बळीराम पवार यांच्यासह दोघांचा जागीच अंत झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

चहाची टपरी बनली मृत्यूचा सापळा

मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा ते जकेकूर उड्डाणपुलादरम्यान महादेव देडे यांची पत्रा शेडमध्ये चहाची टपरी आहे. दुपारी माजी नगरसेवक बळीराम कुशाप्पा पवार (४८, रा. उमरगा) आणि लाडनशा गुलाबशा मुर्शद (५२, रा. चिंचोली भुयार) हे टपरीसमोर चहा पीत बसले होते. त्यांच्यासोबत सचिन कुटार आणि हॉटेल चालक महादेव देडे हे देखील होते.

त्याच वेळी हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या (TS 34 F 4706) या कारचे पुढचे उजव्या बाजूचे टायर अचानक फुटले. कारचा वेग प्रचंड असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही अनियंत्रित कार थेट टपरीसमोर बसलेल्यांच्या अंगावर आदळली.

भीषणता: कार हवेत उडाली अन् अंगावर कोसळली

हा अपघात इतका भीषण होता की, कार पत्रा शेडच्या कट्ट्याला धडकून एखाद्या 'ॲक्शन' चित्रपटातील दृश्याप्रमाणे हवेत उंच उडाली आणि थेट तिथे बसलेल्या लोकांच्या अंगावर कोसळली. या धडकेत बळीराम पवार आणि लाडनशा मुर्शद यांचा जागीच मृत्यू झाला.

सचिन कुटार आणि महादेव देडे गंभीर जखमी झाले असून, सचिन कुटार यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत कार उचलली आणि खाली दबलेल्यांना बाहेर काढले.

कारमधील सर्वजण बचावले

या अपघातात कारच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून तीन-चार दुचाकींचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे कारमधील प्रवाशांना साधे खरचटलेही नाही. अपघातानंतर कारमधील सर्वजण सुखरूप बाहेर पडले.

परिसरात हळहळ

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. लोकप्रिय माजी नगरसेवक बळीराम पवार यांच्या निधनामुळे उमरगा परिसरात मोठी शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news