Crime News : 'पाणी आमचे आहे' म्हणत दोन सख्ख्या भावांना बेदम मारहाण File Photo
जालना

Crime News : 'पाणी आमचे आहे' म्हणत दोन सख्ख्या भावांना बेदम मारहाण

७ जणांवर गुन्हा ; राजापूर शिवारातील घटना; दोघे गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

Two brothers brutally beaten up for saying 'water is ours'

जालना, पुढारी वृत्तासेवा : 'विहिरीचे पाणी आमचे आहे, तुम्ही पाटाने पाणी न्यायचे नाही' असे म्हणत संशयित आरोपींनी दोन सख्ख्या भावांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवार, दि. १० रोजी घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात एका महिला आणि दोन अल्पवयीन मुलांसह एकूण ७ जणांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबड तालुक्यातील राजापूर येथील रहिवासी शेतकरी विष्णू भाऊराव थोटे (वय ४३ वर्षे) यांची राजापूर शिवारात शेती आहे. त्यांच्या शेताशेजारीच आरोपींचीही जमीन आहे. दुपारी ३ वाजेच्या सुमारास विष्णू थोटे आणि त्यांचा भाऊ कचरू भाऊराव थोटे हे दोघे जण आपल्या शेतात विहिरीच्या पाण्याचा पाट (नाली) काढण्याचे काम करत होते.

पाट काढण्याचे काम सुरू असतानाच आरोपी रामेश्वर लिंबाजी थोटे याने त्याच्या हातातील तलवारीने कचरू यांच्या डाव्या हातावर आणि खांद्यावर सपासप वार केले. तसेच इतर आरोपींनी लोखंडी गजाने आणि लाथाबुक्क्यांनी दोघा भावांना बेदम मारहाण केली.

या हल्ल्यात विष्णू आणि कचरू थोटे हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच राजापूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा

जखमी विष्णू थोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिसांनी नवनाथ लिंबाजी थोटे, रामेश्वर लिंबाजी थोटे, सुदाम लिंबाजी थोटे, कावेरीबाई लिंबाजी थोटे, विष्णू लिंबाजी थोटे आणि इतर दोन अल्पवयीन मुले अशा एकूण ७ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगल घडवणे आदींसह विविध कमलान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस हवालदार विलास वाघमारे पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT