भोकरदन ः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात सध्या मिरची पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड सुरू आहे. मात्र, एप्रिल-मे महिन्यातील वाढत्या उष्णतेमुळे वीज उपकेंद्रातील (सबस्टेशन) ट्रान्सफॉर्मर अतिगरम होऊन वारंवार बंद पडत आहेत. याचा मोठा फटका शेतीपंपाच्या वीजपुरवठ्याला बसत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेता, आमदार संतोष दानवे यांनी पिंपळगाव रेणुकाई येथील सबस्टेशनमध्ये ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी तातडीने कुलर व इतर आवश्यक यंत्रणा बसविण्याचे निर्देश दिले आहेत.
पिंपळगाव रेणुकाई परिसरात मिरची हे मुख्य नगदी पीक आहे. या कडक उन्हात मिरचीला नियमित पाणी देणे गरजेचे असते. परंतु, सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे आणि विजेच्या वाढत्या मागणीमुळे सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरची क्षमता संपून ते ओव्हरहीट होत आहेत. ट्रान्सफॉर्मर गरम झाल्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी असूनही वीज नसल्याने मिरचीची पिके कोमेजण्याची भीती निर्माण झाली होती.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या या समस्यांची दखल घेत आमदार संतोष दानवे यांनी संबंधित विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पिंपळगाव रेणुकाई सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी तातडीने कुलर बसवावेत, जेणेकरून यंत्रणा गरम होऊन बंद पडणार नाहीत असे निर्देश आ.दानवे यांनी यावेळी दिले.आमदार संतोष पाटील दानवे यांच्या या तत्पर निर्णयामुळे पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कुलरमुळे ट्रान्सफॉर्मरमधील ऑईलचे तापमान मर्यादित राहील, ज्यामुळे तांत्रिक बिघाड टळतील. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांना मिरची पिकाला वेळेवर पाणी देता येईल. ट्रान्सफॉर्मर जळण्याचे किंवा खराब होण्याचे प्रमाण कमी होऊन सरकारी मालमत्तेचे नुकसान टळेल.मयूर बुलगे, शाखा अभियंता