Traders' strike for the issue of farmers affected by Samruddhi Highway
जालना, पुढारी वृत्तसेवाः समृद्धी बाधित शेतकऱ्यांचे रास्त मोबदल्यासाठी गेल्या ७५ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. जालना जिल्हा व्यापारी महासंघाने समृध्दी बाधित शेतकऱ्यांच्या जमीनीला रास्त भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत पुकारलेल्या बंदला बुधवार (१६) रोजी संमिश्र प्रतिसाद मिळाला.
जालना जिल्हा व्यापारी महासंघाने समृध्दी बाधीत शेतकऱ्यांच्या जमिनीला रस्ता भाव देण्याच्या मागणीला पाठिंबा देत बुधवारी बंद पुकारला होता. जमिनीच्या योग्य मूल्यांकनाच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत.
सदर बाधित शेतकरी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक होताना दिसत आहेत. त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्यास एखादी अप्रिय घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास शासन-प्रशासनाबरोबरच सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांनाही त्याची झळ पोहचण्याची शक्यता आहे.