Total shutdown in Ghansavangi; strong condemnation of the lathi-charge
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला घनसावंगी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी (दि. २३) घनसावंगीसह तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव आणि रांजणी येथील बाजारपेठा कडकडीत बंद राहिल्या. मेडिकल दुकाने व दूध डेअरी वगळता बहुतांश व्यापारी आस्थापने दिवसभर बंद ठेवण्यात आली. यानंतर आंदोलकांनी तहसीलदार रमेश पागोटे यांच्यामार्फत राष्ट्रपतींना मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करीत असताना पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार घनसावंगी शहरासह तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव आणि रांजणी येथील व्यापारी संकुले व विविध आस्थापनांनी बंद पाळून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांचा विचार करून संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. या आंदोलनात व निवेदन सादरीकरणावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर खरात, तालुकाध्यक्ष समाधान तोडके, तालुका महासचिव बाबासाहेब गालफाडे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, तालुका उपाध्यक्ष राजकिरण राजगुरू, भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष संतोष येडे तसेच शहराध्यक्ष आदित्य खरात यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिल्ली येथील जंतर मंतर वरील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र बंदला जालन्यात संमिश्र प्रतिसाद
जालना : दिल्ली येथील जंतर मंतर मैदावरील शांततेत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी अमानुष लाठीचार केला. त्या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देत गुरुवार, दि. २३ रोजी जालना शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने, प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत संमिश्र प्रतिसाद दिला. जालना शहरातील विविध भागांतून रॅली काढून व्यापारी वर्गांना बंदचे आवाहन करण्यात आले. या आवाहनास व्यापारी वर्गाने प्रतिसाद देत आपले व्यवहार बंद ठेवले, काही शैक्षणिक संस्थांनी शाळेला सुट्टी देत बंद पाळला.