आन्वा ः अवकाळी पावसाचा तिळाच्या पिकाला जबरदस्त फटका बसल्याने यंदा उत्पादनात तब्बल 90 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. याचा थेट परिणाम मकर संक्रांतीच्या बाजारावर दिसून येत असून तीळ आणि गूळ दोन्हींच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे.
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळागुळाची खरेदी करताना ग्राहकांची चांगलीच कोंडीत होत आहेत. दरम्यान 14 जानेवारीला मकरसंक्रांत आहे. या सणाला महिला तीळगूळासह वाण वाटप करत असतात. महिनाभर महिला हा सण साजरा करतात. यंदा तिळाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने तिळगुळाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. तीळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणणे यंदा महागात पडणार आहे.
ऑक्टोबर - नोव्हेबरमध्ये झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे तिळाची पिके अक्षरशः आडवी पडली. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात काढणीपूर्वीच पीक नष्ट झाले. त्यामळे बाजारात तिळाची आवक घटली आहे. मागील वर्षी प्रतिकिलो 180 ते 200 रुपये दरम्यान असलेला तिळाचा भाव यंदा सरासरी 25 टक्क्यांनी वाढला आहे, परंतु सण साजरा करण्यासाठी खरेदी करावी लागत आहे.
स्थानिक बाजारात सध्या पांढऱ्या तिळाचा दर प्रतिकिलो 220 ते 260 रुपये, तर काळ्या तिळाचा दर 250 रुपये दरम्यान आहे. मात्र, सण साजरा करण्यासाठी खरेदी करावी लागत आहे. संक्रांती जसजशी जवळ येईल, तसतशी मागणी वाढणार असून तीळ व गुळाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.