Thrips disease outbreak increases in cotton crops
भोकरदन तालुक्यात ४० हजार हेक्टरवर लागवड झालेल्या कपाशीवर होणाऱ्या विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकरी कापसाकडे नगदी पीक म्हणून पाहत असतो. मात्र, दरवर्षी विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे कापूस पीक धोक्यात येत आहे. त्यामुळे उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाची झाडे मोठ्या प्रमाणात मरत आहेत. अशात कापसाचे पीक कसे वाढवावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. मोठ्या प्रमाणावर महागडे असणारे बियाणे, तसेच मशागत आणि औषधे यांच्यावर शेतकऱ्यांचा खर्च झाला आहे. अशातच आता कापसाची उभी झाडे मोठ्या प्रमाणात कोकडा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पिकासाठी केलेला खर्च शेतकऱ्यांच्या डोक्यावर बसणार आहेत. यातून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून, खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
काही दिवस सतत पाऊस झाल्यानंतर पिकांवर मोठ्या प्रमाणात श्रीप्स व किड रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असून कापूस उत्पादनात वाढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. दमदार पावसानंतर शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने मुळांना अन्नद्रव्यांचे शोषण करता येत नाही. ढगाळ वातावरणामुळे त्यांना सूर्यप्रकाश मिळणेही मुश्कील झाले आणि अचानक ऊन पडल्यावर बुरशी कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात होत आहे. या रोगामुळे पानांचा रंग फिकट व पिवळसर पाने होऊन अखडली असून कोकडा हा रोग फुलोऱ्याच्या काळात जास्त दिसून येत आहेत.
कपाशी पिकांवर विविध रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी औषधीची फवारणी करण्यात येत आहे. तरीही रोगाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. कृषी विभागाच्या वतीने शेतकरी यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.