Three kg of ganja seized in Jalna city
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील कैकाडी मोहल्ला परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची किंमत ६५ हजार रुपये आहे.
पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांनी अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार ३० एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कैकाडी मोहल्ला परिसरात गांजाची चोरटी विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. कारवाईदरम्यान संशयीत कैलास राजू गायकवाड (रा. कैकाडी मोहल्ला) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.