Jalna News : पाडव्याच्या मुहूर्तावर डाव्या कालव्यात पाणी; हरभरा-ज्वारीचे क्षेत्र वाढणार file photo
जालना

Jalna News : पाडव्याच्या मुहूर्तावर डाव्या कालव्यात पाणी; हरभरा-ज्वारीचे क्षेत्र वाढणार

अंबड तालुक्यातील तीस गावांना सिंचनाचा फायदा, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

पुढारी वृत्तसेवा

Thirty villages in Ambad taluka will benefit from irrigation, drinking water problem will be solved along with agriculture

अंबड, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळसदृश परिस्थितीने अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढलेली असतानाच जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून ३०० क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात आले. मंगळवारी (दि. १०) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर अंबड तालुक्यातील जायकवाडी लाभक्षेत्रात कालव्याचे पाणी दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आवर्तनामुळे उभ्या उसाला आधार मिळणार असून, आगामी काळात कमी पाण्यावर येणाऱ्या हरभरा आणि ज्वारीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच तालुक्यातील सुमारे ३० गावांना शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी या आवर्तनाचा मोठा आधार मिळणार आहे.

यंदा पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने अंबड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक ओढे-नाले, विहिरी आणि बोअरवेल कोरडे पडल्याने अंबड : पाडव्याच्या मुहूर्तावर डाव्या तालव्यात पाणी आले आहे.

शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जायकवाडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून गेल्या दोन महिन्यांपासून डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली जात होती. या भागात मोठ्या प्रमाणात ऊस उभा असून, सध्या उसाची तोडणी सुरू आहे. मात्र, पाण्याअभावी उभ्या उसाला पाणी देणे शेतकऱ्यांसाठी आव्हान बनले होते.

धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन लक्षात घेऊन रब्बीच्या पेरणीच्या काळात डाव्या कालव्याचे पाणी बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, शासन स्तरावर जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून चार आवर्तने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिले आवर्तन दि. ९ नोव्हेंबरपासून सुरू झाले असून, हे आवर्तन सुमारे २५ दिवसांचे असणार आहे.

त्यानंतर दर महिन्याला २५ दिवसांचे आवर्तन सोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत डाव्या कालव्याला टप्प्याटप्प्याने पाणी उपलब्ध राहणार आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने रब्बीच्या पेरणीच्या वेळी कालव्यात पाणी नसल्यामुळे या भागातील रब्बीची पेरणी अत्यल्प प्रमाणात झाली आहे.

पुढील काळात उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज असल्याने कमी कालावधीत आणि कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारीची पेरणी वाढण्याची शक्यता असून, हरभऱ्याचे क्षेत्रही यंदा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जायकवाडीच्या या आवर्तनाचा फायदा प्रामुख्याने उभ्या उसाला, हरभरा आणि ज्वारीच्या पिकांना होणार आहे. मोठ्या प्रमाणावर नवीन ऊस लागवड किंवा जिरायती क्षेत्राला पूर्णपणे सिंचनाचा आधार मिळण्याची शक्यता कमी असली, तरी उपलब्ध पाण्यामुळे शेतीला फायदा होणार आहे.

या गावांना फायदा

अंबड तालुक्यातील भांबेरी, नालेवाडी, दह्याला, अंतरवाली सराटी, वडीगोद्री, चुरमापुरी, गुंडेवाडी, बळेगाव, आपेगाव, साष्टपिंपळगाव, महाकाळा, पाथरवाला, पिठोरी, शिरसगाव, घुंगरडे, हादगाव, करंजाळा, एकलहरा, भारडी आदी गावांच्या परिसरातून जायकवाडीचा डावा कालवा जातो.

या कालव्यामुळे या गावांसह तालुक्यातील सुमारे ३० गावांना सिंचनाचा थेट व अप्रत्यक्ष लाभ मिळतो. कालव्यात पाणी दाखल झाल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा कालव्यातून येणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून, पाडव्याच्या मुहूर्तावर लाभक्षेत्रात दाखल झालेले हे पाणी शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT