Thirteen thousand water connections in Jalna are unauthorized
जालना, पुढारी वृत्तसेवा जालना शहरात महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या अनधिकृत नळ कनेक्शन शोध मोहिमेत १३ हजार नळ कनेक्शन अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. १३ हजार अनाधकृत नळ कनेक्शनधारकांपैकी पाच हजार अनधिकृत कनेक्शनधारकाना लोकअदालतमधे हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात येत आहेत.
जालना शहर महानगरपालिकेच्यावतीने जानेव-ारी २०२५ पासून अनधिकृत नळ कनेक्शन शोध मोहिमेचे काम साई एजन्सीमार्फत सुरू आहे. एजन्-सीच्यावतीने करण्यात आलेल्या शोध मोहिमेत आजपर्यंत ३२ हजार घरी नळाचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात २७ हजार फॉर्मची पडताळणी झालेली आहे. त्या मध्ये १३ हजार नळ कनेक्शन अनधिकृत आढळून आले आहेत. त्यांना मनपाच्यावतीने नोटिसा देण्यात येत आहेत.
नोटिसा देण्यात आलेल्या अनधिकृत नळ धारकांना नोटीस देऊन कमीत कमी ७ दिवस झाले आहेत. त्यांनी नोटीस मिळाल्यानंतर मनपामध्ये येऊन दहा हजार रुपये दंड भरणा केला नसेल किंवा नळ कनेक्शन नियमित असल्याचा पुरावा दिला नसेल अशा पाच हजार नागरिकांचे अनधिकृत नळ धारकांचे प्रकरणे १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवले आहेत. पाच हजार नळ कनेक्शनधारकांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. १२ सप्टेंबरपर्यंत नोटीस वाटप करण्यात येणार असून १३ सप्टेंबर रोजी नागरिकानी लोकअदालतमध्ये यावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
जालना शहरात मालमत्ता मोठ्या संख्येने असताना नळ कनेक्शनची संख्या अत्यंत कमी आहे. यामुळे जे अधिकृत नळ कनेक्शनधारक आहेत. त्यांना पाणी कमी दाबाने मिळत असल्याने ते नळपट्टी थकवीत आहेत. दुसरीकडे अनधिकृत नळ कनेक्शनधारक पाणी पळवित असल्याने पाण्याचे गणित बिघडले आहे.
जायकवाडी पाणीपुरवठा योजनेतून येणाऱ्या पाण्यासाठी लाखो रुपयांचे वीज बिल येत असताना तुलनेत नळपट्टी बिलातून कमी पैसे येत असल्याने जालना महापालिकेच्या तोट्यात वाढ झाली असल्याने अनधिकृत नळ कनेक्शन महापालिकेच्या रडारवर आले आहेत.
लोकअदालत मध्ये अनधिकृत नळधारक आल्यानंतर त्यांना त्याच्या सुनावणी कक्षापर्यंत पोहचवण्यासाठी मनपाच्या वतीने ४० अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्यवस्थापनासाठी मनपा कार्यालयात बैठक घेण्यात आली आहे.
नोटीस मिळालेल्या अनधिकृत नळ धारकांनी १३ सप्टेंबर रोजी लोकअदालतीमध्ये हजर राहावे, असे आवाहन जालना शहर महापालिकेचे सहायक आयुक्त केशव कानपुडे यांनी केले आहे.