

OBC Maratha sub committees
वडीगोद्री : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर मोठ्या मनाने ओबीसींसाठी उपसमिती गठीत केली असेल. तर त्या उपसमितीने आणि उपसमितीच्या सदस्यांनी, जातीजातीमध्ये भांडण लावण्यापेक्षा त्या उपसमितीचा फायदा गोरगरीब ओबीसीच्या योजना राबवण्यासाठी केला पाहिजे, असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. ओबीसीची उपसमिती झाली म्हणजे मराठ्याच्या विरोधात गरळ ओकायला नको किंवा मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन खोटे निर्णय घेणे हे व्हायला नको, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अंतरवाली सराटीत पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पुढे म्हणाले की, माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, ओबीसी उपसमिती ही लोकांना जातीवाद वाटू नये. तसेच मराठा उपसमितीमध्ये आणि ओबीसी उपसमितीमध्ये जातीवाद वाटू नये. त्यासाठी मराठा उपसमिती आणि ओबीसी उपसमिती या दोन्हीमध्ये मराठा आणि ओबीसी समाजाचे मंत्री असावेत. ओबीसींच्या उपसमितीमध्ये फक्त ओबीसी आणि मराठा उपसमितीमध्ये फक्त मराठा असा दुजाभाव नसावा. यावर सुद्धा बारकाईने लक्ष मुख्यमंत्र्यांनी ठेवलं पाहिजे.
अंतरवाली सराटीत जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांवर बोचरी टीका केली. ‘छगन भुजबळ यांच्यावर जास्त लक्ष ठेवलं पाहिजे. मराठा आणि ओबीसी आता कुठेतरी एक होतोय. देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळांमुळे डाग लागू नये याची काळजी घेतली पाहिजे. छगन भुजबळ यांना नाव आणि प्रसिद्धीची खूप मस्ती आहे. ते सरकारसाठी मोठी डोकेदुखी बनले आहेत’, अशा शब्दात त्यांनी भुजबळांचा समाचार घेतला.
भुजबळ सरकाला पद्धतशीरपणे अडचणीत आणत आहेत. जोपर्यंत भुजबळ आहेत, तोपर्यंत मराठा आणि ओबीसी समाज एकत्र येऊ शकत नाही. सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा हा माणूस मोठा नाही. त्याचे पाय धरा, खाली आपटा आणि त्याला तुरुंगात जाऊ द्या, असंही त्यांनी सांगितले.
मराठवाड्यातील मराठा समाज शंभर टक्के कुणबी असून हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारे त्यांना तातडीने प्रमाणपत्रे द्यावीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या अभियानाप्रमाणे ही प्रक्रिया राबवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.