Thieves' Plot at the Bus Stand Foiled
जालना, पुढारी वृत्तसेवा: अंबड बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांची टोळी गजाआड करण्यात अंबड पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी अत्यंत चपळाईने तपास चक्र फिरवत अवघ्या काही तासांत या चोरीचा छडा लावला. पोलिसांनी दोन आरोपींना वेड्या ठोकून त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे २५ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अंबड बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होती. याचाच फायदा घेत चोरट्यांनी एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले होते. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेने तात्काळ अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
तक्रार दाखल होताच अंबड
पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तसेच आपल्या खबऱ्यांच्या जाळ्याचा वापर करून संशयितांचा माग काढला. संशयितांची ओळख पटवून पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन अट्टल चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कसून चौकशीत चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या धाडसी मोहिमेत पोलीस कर्मचारी यशवंत मुंडे, दीपक चव्हाण, महिला पोलीस रेखा मोरे, कॉन्स्टेबल अर्जुन मुंडे, विजय चंद्रे आणि तुकाराम मदन यांनी विशेष कामगिरी बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अमरनाथ तोडकर करत आहेत.