There is a growing trend among citizens towards gold and silver for festive shopping.
जालना, पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, चांदीच्या दरातही झळाळी आल्यामुळे दागिने बाजारात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चांगली उलाढाल सुरू झाली आहे. पारंपरिक गुंतवणूक आणि सणांच्या खरेदीसाठी नागरिकांचा सोने-चांदीकडे वाढता कल दिसून येत आहे.
स्थानिक सराफ व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २९ हजार ४४० रुपये प्रति १० ग्रॅम तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख १८ हजार ६५० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. चांदीचा दरही प्रति किलो १ लाख ७० हजार ७९० रुपये इतका पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वीच्या तुलनेत हे दर ३ ते ५ हजार रुपयांनी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यामुळे शहरातील दागिन्यांच्या दुकानांमध्ये गर्दी वाढलेली दिसत आहे. दिवाळी, लग्नसराई व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. विशेष म्हणजे, गुंतवणुकीसाठीही नागरिकांचे सोने हे पहिल्या पसंतीचे साधन ठरत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी वाढली असून त्याचा बेट परिणाम स्थानिक बाजारावर दिसत आहे. मध्य पूर्व आणि आशियाई देशांमधील खरेदी वाढल्यामुळे भारतातील बाजारात दर वाढले असल्याचे सराफ व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घटल्याने सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दरात वाढ होत आहे. दिवाळीचा हंगाम सुरू झाल्याने ग्राहकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सध्या दर जरी वाढलेले असले तरी लोक गुंतवणुकीच्या हेतूने तसेच पारंपरिक खरेदीसाठी सोन्याकडे वळत आहेत. दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांवर काही प्रमाणात ताण आला असला तरी लग्नसराई आणि दिवाळीच्या खरेदीला नागरिकांनी सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून विशेष ऑफर्स देण्यात येत आहेत. सणासुदीच्या काळात सोने दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.
जालना जिल्ह्यातील सराफ बाजारात यंदा मोठ्या प्रमाणात व्यवहार होण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या दरवाढीमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक या दोघांच्याही नजरा सोन्या-चांदीच्या भावावर खिळल्या आहेत.सोन्या-चांदीच्या दरात वाढ
सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २९ हजार ४४० रुपये प्रति १० ग्रॅम तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख १८ हजार ६५० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. चांदीचा दरही प्रति किलो १ लाख ७० हजार ७९० रुपये इतका पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वीच्या तुलनेत हे दर ३ ते ५ हजार रुपयांनी वाढले आहे.-भरत गादिया, भरत ज्वेलर्स,