

The market is decorated for the Diwali festival.
जालना, पुढारी वृत्तसेवा वर्षभरातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी झाली आहे. नोकरदारवर्गाची दिवाळी खरेदीसाठी लगबग सुरू आहे. अतिवृष्टीच्या तडाख्याने यंदा शेतकरी ऐन दीपावलीच्या तोंडावर हवालदिल झाला असल्याचे चित्र आहे. दिवाळी सणानिमित्त बाजारात क्रिकेट बॅट, हातोडा, कार, टीनच्या डब्यातील फॅन्सी आनार आदी नवीन फटाके बाजारात दाखल झाले आहेत. आकर्षक आकाशकंदील, दिवे, हार व माळांनी बाजारपेठ सजली आहे.
दिवाळी सणामुळे जालना शहराची बाजारपेठ सजली आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे एक वेगळे महत्त्व असल्याने प्रत्येक दिवसासाठी लागणाऱ्या विविध स्वरूपातील वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजार पेठत गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणासाठी बाजारपेठ बहरली आहे. प्रकाशाचा झगमगाट करणारे आकाशकंदील, दिवे, पणत्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. विविध डिझाइन, रंगसंगती, आकारांतील आकाशकंदील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कागदांच्या वाढत्या किमतीमुळे यंदा आकाशकंदील जवळपास २० टक्क्यांनी महागले आहेत. किराणा सामान, फटाक्यांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तु, फूलवाल्यांची दुकाने, कपडयाची दुकाने, मिठाईची दुकाने, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने आदी दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. आकाशकंदील लक्ष वेधत आहे.
दीपोत्सवासाठी रंगीबेरंगी कागदी. कापडी आणि प्लास्टिकचे आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. दोन वर्षांनंतर यंदा आकाशकंदिलाच्या बाजाराला बहर आला आहे. पारंपरिक आणि काही नव्या प्रकारातील आकर्षक आकाशकंदिलांनी बाजारपेठा सजल्या आहेत. चांदणी, पेशवाई, टोमॅटो बॉल,बपॅराशूट यांच्यासह इको फ्रेंडली हॅण्डमेड आकाशकंदील यंदा बाजारात आहेत. दिवाळीनिमित्त घर सुशोभित करण्यासाठी विविध आकर्षक स्टीकर बाजारात आले आहेत. यात शुभ-लाभ, स्वस्तिक, पावले. श्री, ॐ आणि इतर सजावट साहित्याचा समावेश आहे. ३ कागदी, प्लास्टिक, पीव्हीसी, मेटॅलिक, अक्रेलिक, अशा अनेक प्रकारांत दाखल आहेत. मोती तसेच फुलांचे तोरण बाजारात आले आहेत.
फटाक्यांच्या किमतीत वाढ
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या किमतीतही काहीशी वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गतवर्षी ४५ रुपयांत विक्री झालेले सतरंजी फटाके ६० रुपये झाले आहेत. बाजारात नवीन दाखल झालेला क्रिकेट बॅट २५०, हतोडा २५०, कार २५०, टीन मधील फॅन्सी आकाराचा आनार ४५० रुपयांना विक्री होत आहे.