जालना

…तर पुन्हा उपचार बंद करणार : मनोज जरांगे-पाटील

अविनाश सुतार

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : सरकारकडून मध्यस्थीसाठी कुणीही येत नाही. सरकारने आरक्षणाचा विषय तातडीने तडीस नेतो, असे आश्वासन दिले म्हणून सलाईन लावली आहे. सरकारने जर शब्द फिरवला तर पुन्हा उपचार बंद करीन, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी आज (दि. १२) पत्रकार परिषदेत दिला.

आरक्षण तडीस गेल्याशिवाय मागे हटणार नाही. सरकारच्या वतीने आरक्षण विषय लवकर तडीस नेऊ, असे आश्वासन मिळाल्याने सलाईन लावली आहे. आमचा विषय मार्गी लागला पाहिजे, आमचे कुणबी प्रमाणपत्र निघायला हवेत. सरकारला आता पुराव्यांचा आधार मिळालेला आहे. आता सगे सोयरे कायदा व्हायला हवा. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत. जोपर्यंत विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत सरकारवर विश्वास ठेवणार नाही, अंमलबजावणीला ५ महिने वेळ लागतो का? पण सरकारचा मान सन्मान ठेवायचा म्हणून उपचार घेणे सुरू केले आहे.

मराठा बांधव मला भेटायला येत आहेत. त्यांनी येऊ नये, कामे उरकून घ्या. मराठा बांधवांनी इकडे गर्दी करू नये, शेतीची कामे उरकून घ्यावी, एकजुट मराठ्यांनी कायम ठेवावी. सर्वांनी आपल्या एकजुटीचा धसका घेतला आहे.

आधीही १७-१७ दिवस त्यांनी आमच्या उपोषणाकडे दुर्लक्षच केले. पण आता जर त्यांनी छळ केला. तर त्यांची जिरवल्या शिवाय राहणार नाही. मला माझी जात मोठी करायची आहे. म्हणून मंत्र्यांच्या शब्दांचा सन्मान केला आहे. आमचं देणं घेणं फक्त आरक्षणाशी आहे. जो मंत्री आमचे काम करेल, त्याचे उघड नाव घेऊन कौतुक करेल. सरकारला आम्ही वेठीस धरत नाही.

जरांगे यांच्या साडेनऊ मागण्या मान्य झाल्या आहेत. थोड्यासाठी त्यांनी आता अट्टाहास धरू नये, असे भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. यावर कोणत्या मागण्या मान्य झाल्या आहेत, त्या पाटील यांनी सांगाव्यात, असे आवाहन जरांगे यांनी दिले. मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्या मागण्या हनुमानाच्या शेपटी सारख्या वाढतच आहेत, असे वक्तव्य केले आहे, यावर जरांगे म्हणाले की, ते बधीर झाले आहेत. त्यांना काय कळते. त्यांच्यामुळे ओबीसी समाज अडचणीत आला आहे, असे ते म्हणाले. आरक्षण दिले तर ठीक अन्यथा आरक्षण देणारे लोक आम्ही बनवू. मला माझ्यासाठी समाज मोठा आहे. जर सरकार आणि मंत्र्यांनी आरक्षण दिले नाही. तर सलाईन काढून फेकीन, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT