जालन्यातील प्रतिपंढरपुरात दुमदुमले 'भज गोविंदम्'चे सूर file photo
जालना

जालन्यातील प्रतिपंढरपुरात दुमदुमले 'भज गोविंदम्'चे सूर

श्रीआनंदी स्वामींच्या आषाढी पालखी सोहळ्यात सर्वधर्मीय ऐक्याचे दर्शन, विविध खेळांचे प्रात्यक्षिक

पुढारी वृत्तसेवा

The tunes of 'Bhaj Govindam' resonate in Pratipandharpur in Jalna

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहराचे आराध्य दैवत आणि 'प्रतिपंढरपूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री आनंदी स्वामी महाराज संस्थानच्या आषाढी पालखी सोहळ्याने शनिवारी संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. "भज गोविंदम्, भज गोपाल" आणि "आनंदी स्वामी महाराज की जय" च्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले. पारंपरिक वाद्यांचा निनाद, भाविकांनी दर्शनासाठी केलेली प्रचंड गर्दी यामुळे जालना नगरीत आषाढी एकादशीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला.

सुमारे तीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रोत्सवाला जालना शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात विशेष स्थान आहे. सतराव्या शतकापासून सुरू झालेली ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. १९४७पासून श्री आनंदी स्वामी महाराजांची पालखी नित्यनेमाने काढली जात आहे. निजामकालातही या परंपरेत खंड पडला नाही.

आषाढी यात्रेनिमित्त आयोजित सप्ताहात सात दिवस आधी श्री आनंदी स्वामी महाराजांच्या मूर्तीस 'सप्तरूपे'. देण्यात आली होती. दररोज स्वामींना विविध आकर्षक वेशभूषा परिधान करण्यात आले. त्यायत बालाजी, राम-लक्ष्मण, खंडेराया, शिव-पार्वती, विठ्ठल-रुक्मिणी आणि शेषनारायण अशा विविध रूपांतील स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत होती. या देखाव्यामुळे मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची रेलचेल कायम होती.

शनिवारी सकाळी आठ वाजता पालखी मिरवणुकीला मंदिरातून विधिवत प्रारंभ झाला. त्यानंतर शनी मंदिर, कचेरी रोड, गणपती गल्ली, कुच्चर वटा, बाजार पोलिस चौकी, कैकाडी मोहल्ला, कसबा विठ्ठल मंदिर, गांधी चमन आणि आनंदी स्वामी गल्ली मार्गे पालखी पुन्हा मुख्य मंदिरात दाखल झाली. संपूर्ण मार्गावर भाविकांनी स्वामींचे दर्शन घेत फुलांची उधळण केली. अनेक ठिकाणी रस्त्यिावर आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत करण्यात आले, वारकरी आणि भाविकांसाठी विविध सेवाभावी संस्था फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

मिरवणुकीत ढोल-ताशा पथके, लेझीम, झांज वादन, भजनी मंडळे आणि बालगोपाळांनी सादर केलेल्या मल्लखांबाच्या कसरतींनी उपस्थितांची मने जिंकली. टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा अखंड निनाद सुरू होता. वारकरी अभंग आणि भजनांच्या माध्यमातून भक्तिरसाचा वर्षाव करीत पालखीसोबत मार्गक्रमण करत होते.

या पालखी सोहळ्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. विविध समाजघटकांनी पालखीचे स्वागत करत सेवा कार्यात सहभाग घेतला. त्यामुळे हा सोहळा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणूनही ओळखला जातो.

आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने जालना शहराने पुन्हा एकदा आपली समृद्ध धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वैभव अनुभवले. 'प्रति पंढरपूर' म्हणून ओळख असलेल्या श्री आनंदी स्वामी महाराज संस्थानचा हा सोहळा जालन्याच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असून, दरवर्षी हजारो भाविकांना भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत राहतो. मिरवणूक मार्गा‌वर ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

खोतकरांनी खेळली लाठी-काठी

मिरवणुकीत आ. अर्जुनराव खोतकर यांनी लाठीकाठी खेळून उपस्थितांचे लक्ष वेधले. यात्रेनिमित्त विविध वस्तूंचे स्टॉल लागल्याचे पहावयास मिळाले. पहाटे आठ वाजता श्री आनंदी स्वामी मंदिरातून निघालेली पालखी मिरवणूक रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT