The dried-up bed of the Godavari river has filled up
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील जायकवाडी (नाथसागर) धरणातील पाणीसाठा वाढल्याने गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलविसर्ग सुरू करण्यात आला असून, त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे पाणी तालुक्यात पोहचले असल्याने पिकांना फायदा होणार आहे.
असून धरणाची पाणीपातळी १,५२०.७० फूट इतकी नोंदविण्यात आली आहे. धरणात सध्या १३ हजार १६३ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी गोदावरी नदीपात्रात १९ हजार २६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. याशिवाय सिंचनासाठी डाव्या कालव्यातून ७०० क्युसेक तर उजव्या कालव्यातून १,००० क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे.
दीर्घकाळ कोरडे पडलेले गोदावरीचे पात्र आता पुन्हा प्रवाहित झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी नदीला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र पहायला मिळत असून नागरिकांनी नदीकाठी जाऊन वाहत्या पाण्याचे स्वागत केले. गोदावरी ही मराठवाड्याची जीवनवाहिनी मानली जात असल्याने या जलविसर्गाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले होते. खरीप हंगामावरील वाढते संकट लक्षात घेता गोदावरीत आलेले हे पाणी अनेक शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. आगामी काळात समाधानकारक पाऊस होऊन खरीप पिकांना नवसंजीवनी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
"जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या सर्व नागरिकांनी अत्यंत सतर्कता बाळगावी. नदीपात्र, पूल, बंधारे तसेच पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. परिस्थितीवर प्रशासनाचे सातत्याने लक्ष असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.- रमेश पागोटे, तहसीलदार, घनसावंगी
"गेल्या काही आठवड्यांपासून पावसाअभावी पिके करपण्याच्या मार्गावर होती. गोदावरीत पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या विहिरींना जीवदान मिळेल आणि ऊस, भाजीपाला तसेच इतर पिकांना वेळेवर पाणी देता येईल. ही केवळ नदीत सोडलेले पाणी नसून शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे. आता निसर्गानही साथ द्यावी आणि चांगला पाऊस पडावा, एवढीच अपेक्षा आहे." -रवी गाभाड, शेतकरी भोगाव