

Arrival of Shri Gajanan Maharaj Palkhi in Shahapur today
शहापूर, पुढारी वृत्तसेवा : आषाढी यात्रेनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथून श्री क्षेत्र शेगाव येथे परतीच्या प्रवसाकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराज पालखीचे शुक्रवार, ७ ऑगस्ट शुक्रवार रोजी सायंकाळी ५ वाजता अंबड तालुक्यातील शहापूर येथे आगमन होणार आहे.
गावकऱ्यांच्या वतीने पालखी सोहळ्याचे आगमनाच्या ठिकाणाची स्वच्छता करण्यात आली. वारकऱ्यांची जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. मागील ५७वर्षांपासून श्री गजानन महाराज पालखीचे शेगाव ते पंढरपूर वारी सुरू असल्याचा इतिहास आहे. अतिशय शिस्तबध्द पालखी सोहळा म्हणून श्रींच्या पालखी सोहळ्याची ओळख आहे. दि. ७रोजी संत गजानन महाराज यांच्या पालखीचे जालना जिल्ह्यात आगमन होणार आहे. जिल्ह्यातील पहिला पालखीचा मुक्काम अंबड तालुक्यातील शहापूर येथे होणार आहे.
सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिस अधीक्षक यांनी ११ ऑगस्टपर्यंत जड वाहनांच्या वाहतुकीत बदल केले आहे. ७ऑगस्ट रोजी बीडकडून जालन्याकडे जाणाऱ्या वाहनांना वडिगोद्री हरी ओम हॉटेलपासून वडिगोद्री, पाचोड अंबड मार्गे जालना तर जालन्याकडून बीडकडे जाणाऱ्या वाहनांना अंबड, घनसावंगी, तीर्थपुरी, शहागड मार्गे बीडकडे वळविण्यात आली आहे.
८ व ९ ऑगस्ट रोजी बीडकडून जालन्याकडे जाणाऱ्या वाहनांना वडिगोद्री पाचोड जामखेड किनगाव चौफुली बदनापूर मार्गे जालना तर जालन्याकडुन बीडकडे जाणाऱ्या वाहनांना जालना, रोहणवाडी, घनसावंगी तीर्थपुरी शहागड मार्गे बीडकडे वळविण्यात आली आहे.
असा आहे वाहतूकीत बदल
अंबड चौफुली, मंठा चौफुली, कन्हैयानगर बायपास जालना- नाव्हा-सिंदखेड राजा मार्गे सुलतानपूर-मेहकरकडे जाणारी व येणारी जड वाहतुक पर्यायी मार्ग कन्हैयानगर जालना मार्गे देऊळगाव राजा-चिखलीकडे जातील व येतील, या मार्गाच्या जड़ वाहतुकीसाठी दि. ११ सकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. असा आदेश पोलिस अधीक्षक यांनी पारित केला आहे.