The copper wires were stolen after burning the wires of fifty electric motors
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी परिसरात पिकांना पाणी देण्यासाठी पैठण मुख्य डाव्या कालव्यावर शेतकऱ्यांनी बसविलेल्या ५० विद्युत मोटारीचे तांब्याचे केबल लोडशेडिंगचा फायदा घेत जाळून तांब्याची तार चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी चोरट्यांनी विद्युत मोटारीचे स्टार्टरही चोरून नेले आहे.
अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी भागात पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांनी डाव्या कालव्यावर मोठ्या संख्येने विद्युत मोटारी बसविल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून विद्युत मोटारी, केबल वायर व स्टार्टरची मोठ्या प्रमाणावर चोरी होण्याचे प्रकार सुरू असल्याने शेतकरी त्रस्त असतानाच चोरट्यांनी तब्बल पन्नास विद्युत मोटारीचे विद्युत केबल जाळून त्यातील तांब्याचे तार चोरून नेली.
शेतातील भुरट्या चोऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त असुन या चोरट्यांचा बंदोबस्त होत नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. अंतरवाली परिसरातील नालेवाडी ११, के. व्ही. फिडरमधून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतकरी शेतात थांबत नाहीत. या संधीचा फायदा उचलून अंतरवाली सराटी, नालेवाडी, रामगव्हाण बुद्रुक, टाका, चुर्मापुरी या भागातील शेतकऱ्यांनी डाव्या कालव्यातून पिकाला पाणी घेण्यासाठी बसवलेले जवळपास पन्नासपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे स्टार्टरपासूनचे केबल कालव्याच्या दोन्ही बाजूंनी पाण्यात उतरून कापून काढले. त्यानंतर ते केबल नालेवाडी शिव ारातील बाळू वाघमारे यांच्या मोसंबीच्या शेतात नऊन सदर केबल जाळून त्यातील तांब्याची तार काढून नेल्याचे सकाळी निदर्शनास आले. शनिवारी सकाळी शेतकऱ्यांनी लाईटची वेळ होऊनही विद्युत मोटारी सुरू होत नसल्याने कालव्यावर जाऊन पाहणी केली असता त्यांना विद्युत मोटारीचे वायर चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
यानंतर चोरट्यांनी अंतरवाली सराटी येथे वितरिका क्रमांक १६, जवळ शेतरस्त्यावरही वायर जाळून तार काढून नेल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.
बंदोबस्त करा
अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटीसह नालेवाडी, रामगव्हाण बुद्रुक, टाका, चुर्मापुरी भागात विद्युत पंप चोरीच्या घटना वाढल्या असून शेतकरी व सामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. विद्युत पंप चोरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे