

Jalna News: Ambad town observed a complete shutdown throughout the day
अंबड, पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शहरात शनिवार (दि. १७) रोजी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या संचारबंदीला प्रतिसाद मिळाला असून दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे दिवसभर शुकशुकाट पहायवयास मिळाला.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अंबड शहरात शनिवारी पहाटे ५ वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी लागू करण्यात आली होती.
धनगर समाजाचे नेते तथा धनगर योद्धा दीपक बोऱ्हाडे हे १७ जानेवारी रोजी जालना येथून मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषणासाठी रवाना होणार होते. मात्र आझाद मैदान पोलिस ठाणे मुंबई यांनी कलम १६८ अंतर्गत नोटीस देऊन सदरच्या उपोषणाची परवानगी नाकारली आहे. तसेच सध्या सार्वत्रिक जिल्हा परिषद निवडणुक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असल्याने संबंधित जिल्ह्यामधून आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली आहे.
दरम्यान आंदोलन करते हे एकत्र येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतील ? अशी शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सदरचा निर्णय घेतला असल्याचे परिपत्रक जारी करून सदरील संचारबंदी आदेशानुसार शाळा, महाविद्यालय, दुकाने व सर्व आस्थापना बंद राहतील तसेच कोणत्याही प्रकारची शस्त्रे, ज्वलनशील पदार्थ किंवा स्फोटके बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली.
तणावपूर्ण शांतता
पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून शहरातील व्यापार पेठ, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये कडकडीत बंद असल्यामुळे मानवी शुकशुकाट तसेच बस स्थानक परिसरात तुरळक प्रवासी दिसून आल्याने सद्यस्थितीत तणावपूर्ण शांतता होती.