'That' principal finally suspended, orders issued by the Chief Executive Officer
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील टाकळी येथील मद्यपी प्रभारी मुख्याध्यापक दामू भीमराव रोजेकर यांचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबन काळामध्ये त्यांनी मंठा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात हजर राहावे, असे आदेश जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम. मिनू यांनी दिले आहेत.
याबाबत दिलेल्या आदेशात म्हटले आहे की शुक्रवार (११) रोजी भोकरदन तालुक्यातील टाकळी भोकरदन येथील प्राथमिक शाळेमध्ये प्रभारी मुख्याध्यापक हा दारू प्यालेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या खिशातसुद्धा दारूची बाटली आढळून आली. याबाबत गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर लगेच गटशिक्षण अधिकारी कार्यालयाचे गट समन्वयक एस. बी. नेवार व इतरांनी या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला.
प्रभारी गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर व प्रभारी गटविकास अधिकारी महेंद्र साबळे यांनी संबंधित मुख्याध्यापकाचा निलंबन प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला होता.
त्यानुसार त्यांनी संबंधित मुख्याध्यापकाने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम कायदा १९६४ व बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा २००९ यांचा भंग केला असून त्यामुळे त्यांचे निलंबन करण्याचे तसेच त्यांनी निलंबन काळात गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती मंठा येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.