युवकाच्या हत्येनंतर जालन्यात तणावाचे वातावरण file photo
जालना

Jalna News : युवकाच्या हत्येनंतर जालन्यात तणावाचे वातावरण

नूतन वसाहत परिसरात दगडफेक; जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

Tension prevails in Jalna after youth's murder

जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना शहरात एका 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. अजय विक्रम आढाव (२५) रा. नूतन वसाहत, जालना) अजय आढाव असे या मृत युवकाचे नाव मयत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी दोन ते तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.

जालना शहरातील नूतन वसाहत भागात राहणाऱ्या अजय आढाव या तरुणाची शहरातील उड्डाणपूल परिसरात निघृण हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी मोठा आक्रोश व्यक्त केला. यावेळी पोलिस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळासह रुग्णालय परिसरात बंदोबस्त ठेवल्याचे दिसून आले. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. युवकाच्या हत्येचे कारण स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांनी भेट दिली.

या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी तीन टीम रवाना झाल्याची माहिती साळी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या घटनेनंतर शुक्रवारी दुपारी नूतन वसाहत भागात दगडफेकीची घटना घडल्याने या भागात काही काळ तणावाचे वातावरण होते. या प्रकरणात पोलिस निरीक्षकांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान मयत अजय आढाव याची पत्नी प्रशंसा आढाव यांनी माध्यमांसमोर बोलताना २ ऑगस्ट रोजी अजय आढाव याचा आरोपीसोबत वाद झाला होता.

यावेळी अजय याला मारहाण करण्यात आल्याने त्याला आयसीयूमध्ये अॅडमीट करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई न केल्याने पतीची आरोपींनी हत्या केली. जोपर्यंत दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे त्यांनी सांगीतले.

मयत आणि आरोपीमध्ये या पूर्वीही वाद झाले होते. त्या अनुषंगाने पोलिस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता अशी माहिती मिळत आहे. जुन्या वादातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र हत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही आहे. त्यामुळे या दिशेने तपास सुरू आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात मयत अजय आढाव याचा भाऊ कुणाल आढाव यांच्या तक्रारीवरून अनिकेत राऊत, शोएब शेख, सादाब शेख, तौफीक शेख याच्यासह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT