Take action against colleges charging fees to students from backward classes
जालना, पुढारी वृत्तसेवा : मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेश व परीक्षा शुल्क आकारणाऱ्या शाळा-महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी लक्षात घेऊन शासकीय वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी, अशा मागण्या स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया च्या जालना जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त, जालना यांना सोमवार, दि. ५ रोजी निवेदन देण्यात आले. यात म्हटले की, महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, संकेतस्थळावरील विविध ांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करता आले नाहीत.
प्रवेशाचे संकेतस्थळ पुन्हा सुरू करून प्रवेश अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात यावा. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क तसेच परीक्षा शुल्क आकारले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर माजी राज्य उपाध्यक्ष अनिल मिसाळ, सेक्रेटरी सचिन गाडगे, बाबासाहेब पाटोळे, शहराध्यक्ष अंबडकर, संदीप पडमुख, दिक्षित पडमुख, रवी पाटोळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.