Manoj Jarange Patil News
अंतरवाली सराटी गावात रात्री ड्रोन फिरत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. Pudhari File Photo
जालना

मनोज जरांगेंवर पाळत? अंतरवालीत पुन्हा ड्रोनच्या घिरट्या, ड्रोन कॅमेऱ्याने रेकी

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे - पाटील हे वास्तव्यास असलेल्या ठिकाणी, आंदोलन स्थळी व गावात ड्रोन कॅमेराद्वारे रेकी होत असल्याचे प्रकार थांबता थांबेना. आणि पोलिसांना सुगावा लागता लागेना. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले असून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मागील आठवड्यात २६ जूनरोजी तसेच सोमवारी (दि. १) रात्री असा दोनदा ड्रोन कॅमेरा द्वारे टेहळणी झाल्याचा प्रकार स्वतः मनोज जरांगे पाटील यांना लक्षात आला होता. आता तोच प्रकार मंगळवारी रात्री पुन्हा तिसऱ्यांदा अंतरवाली परिसरात ड्रोन घिरट्या घालताना दिसले. त्यामुळे नेमके ड्रोनद्वारे रेकी नेमके कोण आणि का करत आहे, याचा तपास लावण्यात पोलीस अपयशी ठरत आहे. मंगळवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक मनोज जरांगे यांच्या भेटीला येऊन गेले. मात्र, त्यांनाही हा तपास किंवा याबाबत सुगावा लागला नाही.

तीनदा ड्रोन कॅमेराद्वारे रेकी, परंतु वेळेत बदल

तीनदा ड्रोन कॅमेराद्वारे रेकी झाली. परंतु वेळ बदलत आहे. प्रथम २६ जून रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास त्यानंतर १जुलै रोजी रात्री साडे नऊ दरम्यान तर २ जुलैरोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास ड्रोनने घिरट्या घातल्या. हा प्रकार सुरू असल्याचे गावकरी, दोन पत्रकार आणि ज्येष्ठ मराठा समन्वयकांनी पाहिले. जरांगे यांनी ड्रोनच्या माध्यमातून पुन्हा रेकी केली असल्याचे माहिती पोलिसांना दिली आहे. तर यासंदर्भातील प्रश्न अधिवेशनात उपस्थित करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर एक शोध पथक नेमले आहे. तरीही याबाबत उलगडा होऊ शकलेला नाही. त्यामुळे रेकी प्रकरणामुळे गावकरी भयभीत झाले आहेत.

ड्रोनच्या घिरट्या घालण्यामागील उद्देश काय?

यासंदर्भात जरांगे म्हणाले की, ड्रोनच्या घिरट्या घालण्यामागील उद्देश काय हे समजले पाहिजे. हा प्रकार वाईट कामासाठी होत आहे की चांगल्या कामासाठी होत आहे? त्यांचा नेमका हेतू काय आहे ? हे ड्रोन कोणाचे आहेत? प्रशासन की अन्य कुणाचे आहेत आणि ते राञीच्या वेळी का येतात? हे समजणे महत्वाचे आहे.

SCROLL FOR NEXT