Jalna News : जालना रेशीम कोष बाजारपेठेत दराची भरारी ! file photo
जालना

Jalna News : जालना रेशीम कोष बाजारपेठेत दराची भरारी !

रेशीम कोषाला ८२० रुपये प्रति किलोचा उच्चांकी दर; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Surge in prices at the Jalna silk cocoon market

जालना, पुढारी वृत्तसेवा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रेशीम कोष बाजारपेठेत रेशीम कोषाला प्रतिकिलो ८२० रुपये दर मिळाल्याने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाधानकारक दरामुळे रेशीम उत्पादकांना मोठा दिलासा मिळत असून जिल्ह्यातील रेशीम उद्योगाच्या वाढीसाठी ही बाब महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा रेशीम कार्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नांतून रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनाची विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बाजारपेठेत खरेदीदारांचा सहभाग वाढत असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या रेशीम कोष उत्पादनाला स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होत आहे.

गुरुवारी परतुर तालुक्यातील खांडवी येथील शेतकरी मदन बरकुले व मदन रंगनाथ बरकुले यांच्या उत्पादित रेशीम कोषाला प्रतिकिलो ८२० रुपये मिळाला असुन गोविंद रंगनाथ बरकुले यांच्या रेशीम कोषाला प्रतिकिलो ८१५ रुपये असा दर मिळालाआहे. या रेशीम कोषाची खरेदी जालना येथील दिशा सिल्क यांनी केली.

रेशीम कोषाला मिळालेला हा दर शेतकऱ्यांसाठी उत्साहवर्धक ठरत असून रेशीम शेतीतून चांगले उत्पन्न मिळविण्याच्या संधी अधोरेखित करत आहे. बाजारपेठेतील पारदर्शक खरेदी-विक्री प्रक्रिया आणि खरेदीदारांची उपलब्धता यामुळे रेशीम उत्पादकांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळण्यास मदत होत आहे.

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक श्री. परमेश्वर वरखडे, रेशीम विकास अधिकारी कु. निर्मला उगले, बदनापूरचे सहायक निबंधक सहकारी संस्था परेश बेरा, जालन्याचे सहायक निबंधक सहकारी संस्था प्रणव वाघमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव भरत तनपुरे, भरत जायभाये, अमोल सोनटक्के, गजानन जहहऱ्हाड, किशोर गोल्डे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

जालना येथील रेशीम कोष बाजारपेठेत मिळालेला ८२० रुपये प्रतिकिलोचा दर हा रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळालेल्या योग्य मोबदल्याचे प्रतीक ठरत असून, जिल्ह्यातील रेशीम उद्योगाच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने आशादायी पाऊल मानले जात आहे.

रेशीम शेतीला मिळणार नवी चालना

रेशीम शेती हा शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळवून देणारा महत्त्वाचा कृषिपूरक व्यवसाय आहे. योग्य मार्गदर्शन, दर्जेदार उत्पादन, विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ आणि खरेदीदारांचा सहभाग या बाबींमुळे रेशीम उद्योगाला चालना मिळत आहे. जालना येथे रेशीम कोषाला मिळालेला समाधानकारक दर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT