अंबड तालुक्यात ऊसतोडणी हंगाम जोरात file photo
जालना

अंबड तालुक्यात ऊसतोडणी हंगाम जोरात

शहागड : कारखानदारीला सुगीचे दिवस, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हंगाम सुरू राहणार

पुढारी वृत्तसेवा

Sugarcane harvesting season in full swing in Ambad taluka

शहागड, पुढारी वृत्तसेवा: अंबड तालुक्यात सध्या ऊसतोडणी हंगाम जोरात सुरू असून यंदा ऊस क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्यामुळे सरासरीपेक्षा जास्त उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे परिसरातील साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगामाला चांगली गती मिळाली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हंगाम सुरू राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अंकुशनगर येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना यंदा विक्रमी गाळपाकडे वाटचाल करत आहे. समर्थ युनिट क्रमांक १ ने सुमारे ९ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले असून तीर्थपुरी सागर युनिट क्रमांक २ ने सुमारे ४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. अशा प्रकारे दोन्ही युनिट मिळून आतापर्यंत जवळपास १२ लाख मेट्रिक टन उसाचे क्रशिंग पूर्ण झाले आहे.

यंदा पावसाळा चांगला झाल्याने तसेच पाणीसाठा मुबलक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या व तिसऱ्या पाळीच्या उसाच्या लागवडीवर विशेष भर दिला आहे. त्यामुळे ऊस क्षेत्र वाढले असून उत्पादनही समाधानकारक झाले आहे. मार्च महिन्यात दोन्ही युनिट पूर्ण क्षमतेने चालल्यास हा आकडा १५ लाख मेट्रिक टनांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शहागड, पाथरवाला, डोमलगाव, गोरी-गंधारी, महाकाळा, साष्टपिंपळगाव, घु. हादगाव, आपेगाव, बळेगाव, चुर्मापुरी आदी परिसरातील आडसाली तसेच १० ते ११ महिन्यांचा ऊस घनसावंगी तालुक्यातील देवी दहिगव्हाण येथील समृद्धी शुगर प्रा. लि., माँ बागेश्वरी, छत्रपती शिवाजी महाराज कारखाना चित्तेपिंपळगाव, बारामती अॅग्रो कब्रड तसेच तीर्थपुरी परिसरातील गूळ युनिट येथेही क्रशिंगसाठी पाठविण्यात येत आहे.

कामगारांचा गौरव

मार्च महिन्यातील रखरखत्या उन्हातही ऊसतोडणी कामगार आणि वाहतूकदार ऊस कारखान्याकडे पोहोचवण्यासाठी अखंड परिश्रम घेताना दिसत आहेत. विक्रमी गाळपाबद्दल कारखाना व्यवस्थापनाने शेतकरी, वाहतूकदार, ठेकेदार, कर्मचारी व कामगार यांचा गौरव केला आहे. यंदा एप्रिल महिन्यात ऊसतोड सुरू राहणार आहे.

क्षेत्र वाढणार

यंदा उसाला ३ हजार रुपयांपेक्षा जास्त दर मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच जायकवाडी धरणात पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे आगामी हंगामातही ऊस लागवडीचे क्षेत्र वाढण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT