Sugarcane crop : तालुक्यात पाण्याअभावी ऊस होरपळला file photo
जालना

Sugarcane crop : तालुक्यात पाण्याअभावी ऊस होरपळला

विहिरींनी गाठला तळ, ऊस पिकावर संकट गडद

पुढारी वृत्तसेवा

Sugarcane crop scorched due to lack of water in the taluka

अविनाश घोगरे

घनसावंगीः जून महिन्याचा तिसरा आठवडा संपला तरी पाऊस न झाल्याने घनसावंगी तालुक्यातील शेतीसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. विशेषतः ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून पाण्याअभावी अनेक ठिकाणी ऊस पिके करपू लागली आहेत. नदी, नाले, विहिरी आणि कूपनलिकांमधील पाणीसाठा झपाट्याने घटल्याने ऊस पिकाला आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी लाखो रुपयांचा खर्च करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर सुकत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

तालुक्यात ऊस हे प्रमुख नगदी पीक मानले जाते. यंदाही चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली होती. मात्र उन्हाळा संपूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने पिकांवर पाण्याचा तीव्र ताण निर्माण झाला आहे. जमिनीतील ओलावा पूर्णपणे निघून गेल्याने ऊसाच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. अनेक गावांमध्ये बोरविहिरींनी अक्षरशः तळ गाठला आहे. काही ठिकाणी मोटार सुरू केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत पाणी संपत असल्याची माहिती शेतकरी देत आहेत.

विहिरींची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून अनेक विहिरी कोरड्या पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे पिकांना नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य बनले आहे. ज्यांच्याकडे काही प्रमाणात पाण्याची सुविधा आहे ते शेतकरीही मर्यादित क्षेत्राला पाणी देत असून संपूर्ण पीक वाचविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.

पाण्याअभावी ऊसाच्या पानांचा रंग बदलू लागला असून अनेक शेतांमध्ये पाने पिवळी पडून वाळत आहेत. काही भागात ऊसाची वाढ खुंटली असून कांड्यांची जाडीही कमी होत असल्याचे चित्र आहे. ऊस हे दीर्घकालीन व अधिक पाणी लागणारे पीक असल्याने सध्याच्या परिस्थितीचा त्याला सर्वाधिक फटका बसत आहे. पुढील काही दिवसांतही पाऊस झाला नाही तर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

हवामान विभागाकडून पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी प्रत्यक्षात दमदार पाऊस होणे अत्यावश्यक बनले आहे. अन्यथा ऊसासह इतर खरीप पिकांनाही मोठा फटका बसू शकतो. सध्या शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असून "आता पाऊसच ऊसाला जीवदान देऊ शकतो," अशी भावना ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे. घनसावंगी तालुक्यात करपत चाललेली ऊस पिके आणि आटत चाललेले पाणीस्रोत ही चिंतेची बाब ठरत आहे.

यंदा ऊस लागवडीसाठी मोठा खर्च करून पीक उभे केले आहे. खत, औषधे आणि मजुरीवर भरपूर खर्च झाला. मात्र जून महिना संपत आला तरी अपेक्षित पाऊस झालेला नाही. विहिरीतील पाणी झपाट्याने कमी होत असून ऊसाला वेळेवर पाणी देणे कठीण झाले आहे. कडक उन्हा मुळे ऊसाची पाने पिवळी पडून करपू लागली आहेत. पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास उत्पादन घटण्याची भीती असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.
- विठ्ठलराव घोगरे, ऊस उत्पादक शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT