जालना ः समाज कल्याण विभागाच्या जालना येथील संत रामदास मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील एका 14 वर्षीय विद्यार्थ्याला तापलेले उलथणे मारल्याची गंभीर घटना रविवारी (दि.18) सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत एसएफआयच्या पदाधिकाऱ्यांनी गृहपालांना चांगलेच धारेवर धरले. विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे शारीरिक, मानसिक छळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करा, अन्यथा समाज कल्याण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा ॲड.अनिल मिसाळ यांनी दिला.
याबाबत वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शनिवार, 17 जानेवारी रोजी रात्री उशिरा अनिल मिसाळ यांना या गंभीर प्रकाराची माहिती दिली होती. त्यामुळे रविवारी सकाळीच त्यांनी काही पदाधिकाऱ्यांसह वसतिगृह गाठले. जुना जालना भागातील बचत भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत रामदास मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहे आहेत. या दोन्ही ठिकाणी साधारणपणे 150 विद्यार्थी राहतात. गृहपालकांकडे तक्रार केली म्हणून भोजन तयार करणाऱ्या कंत्राटदार एजन्सीच्या काही महिला कर्मचाऱ्यांनी एका 14 वर्षीय विद्यार्थ्याला चक्क तापलेले उलथणे मारल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.
गुन्हे दाखल करा - निकृष्ट भोजनाची तक्रार केली म्हणून विद्यार्थ्याला तापलेले उलथणे मारणे चटके देणे, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. याबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. नसता मंगळवारी समाज कल्याण कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करणार आहोत.ॲड. अनिल मिसाळ, एसएफआय, जालना
भोजन व्यवस्था देणाऱ्या डी. एम. इंटरप्रायजेस प्रा. लिमिटेड या कंत्राटदार एजन्सिला काळ्या यादीत टाकण्याबाबत आम्ही वरिष्ठांना अनेकदा प्रस्ताव पाठवलेले आहेत. संबंधित महिलांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.अप्पासाहेब होरशीळ, गृहपाल.