जालना : जालना शहरातील संजयनगर भागात घरासमोर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या किरीषू धनंजय पालकर या चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांनी गुरुवारी सकाळी ८ ते ९ वाजेच्या सुमारास हल्ला चढवीत तिच्या गालाचा लचका तोडला कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जालना शहरात मोकाट कुत्र्यांनी मागील काही महिन्यांपासून हैदोस घातला आहे. मंगळबाजार परिसरात एका चिमुकलीला कुत्र्यांच्या हल्ल्यात जीव गमवावा लागल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. तत्पूर्वी भवानी नगरातील एका बालकावर कुत्र्याने हल्ला केल्याने त्याला साठ टाके द्यावे लागले होते. काही
दिवसांपूर्वी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक व एका पत्रकाराच्या दुचाकीसमोर मोकाट कुत्रे आल्याने ते जबरी जखमी झाले. यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा विषय ऐरणीवर आहे.
जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका बालिकेला जीव गमवावा लागूनही महापालिका प्रशासन कारवाई करीत नसल्याने शहरात कुत्र्यांची दहशत वाढली आहे. महापालिकेने कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.