Steel firm defrauded of ₹1.5 crore; case registered against two partners
जालना, पुढारी वृत्तसेवाः अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील नामांकित 'एम. एस. आर. जे. पित्ती स्टील्स प्रा. लि.' या कंपनीची तब्बल १ कोटी ४२ लाख ३१ हजार ९६५ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील 'चड्डा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स'च्या दोन भागीदारांविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात फसवणूक व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, संदीप पारस गुमरे (वय ४३, रा. रामनगर पोलीस कॉलनी, जालना) हे गेल्या २०१४ पासून पित्ती स्टील्स कंपनीत 'रिकव्हरी ऑफिसर' म्हणून काम पाहतात. अंबरनाथ (जि. ठाणे) येथील डिंपल चड्डा आणि पूजा चड्डा या दोघांनी २०२२-२३ या कालावधीत कंपनीशी संपर्क साधून स्वतःच्या 'चड्डा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स' या फर्मसाठी उधारीवर लोखंडी सळई (TMT Bar) खरेदी करण्याची मागणी केली होती. वेळेत पैसे परतफेड करण्याचे आश्वासन दिल्याने कंपनीने त्यांच्याशी व्यापारी व्यवहार सुरू केले. सुरुवातीच्या काही व्यवहारांचे पैसे देऊन आरोपींनी कंपनीचा विश्वास संपादन केला.
सन २०२३ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत आरोपींनी कंपनीकडून एकूण ७ कोटी ३ लाख ४० हजार ३६० रुपयांचा माल खरेदी केला होता. त्यापैकी त्यांनी ५ कोटी ६१ लाख ८ हजार ३९५ रुपये अदा केले, मात्र उर्वरित १ कोटी ४२ लाख ३१ हजार ९६५ रुपयांची थकीत रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. याप्रकरणी संदीप गुमरे यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिस ठाण्यात आरोपी डिंपल चड्ढा व पूजा चड्डा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात), ५०६ (धमकी देणे) आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार करत आहेत.
वसुली अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
कंपनीच्या वतीने दूरध्वनी व प्रत्यक्ष भेटीद्वारे वारंवार रकमेची मागणी करण्यात आली, परंतु आरोपींनी वेळकाढूपणा करत पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. थकीत रकमेच्या वसुलीसाठी ९ सप्टेंबर २०२६ रोजी कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी संदीप गुमरे व गणेश धोंडीराम डुरे हे मुंबईत आरोपींच्या ठिकाणी गेले असता, आरोपींनी "आम्ही पैसे देत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, पुन्हा पैसे मागण्यासाठी आलात तर पाहून घेतो," अशी जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना हुसकावून लावले.
घटनेचा थोडक्यात तपशील :
बाधित कंपनी: एम. एस. आर. जे. पित्ती स्टील्स प्रा. लि., अतिरिक्त एमआयडीसी, जालना. संशयित आरोपीः डिंपल चड्डा व पूजा चड्डा (रा. कारव, अंबरनाथ, ठाणे). एकूण खरेदी व्यवहारः ७,०३,४०,३६०/-दिलेली रक्कमः ५,६१,०८,३९५/-, (थकीत) रक्कमः ₹१,४२,३१,९६५/-