Soybean prices have collapsed as government procurement has not started.
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्हयात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असतानाच दुसरीकडे शासनाच्यावतीने नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू न झाल्याने बाजारात सोयाबीनचे भाव कोसळल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सोयाबीनचे हमी भाव ५ हजार ३२८ असताना बाजारात ३ ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलने सोयाबीनची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.
जालना मोंढ्यात सोयाबीनची आवक दररोज जवळपास ३० हजार क्विंटलची होत आहे. सोयाबीन शासकीय खरेदी केंद्र अजूनही सुरू झाले नसल्याने बाजारात कमी भावाने सोयाबीन खरेदी केली जात आहे. सोयाबीनची बंपर आवक होत असतानाच सरासरी भाव ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत आहे. जिल्ह्यात नाफेडकडून सोयाबीन खरेदीसंदर्भात अजून आदेश आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे कापूस खरेदीसाठी भारतीय कापूस निगमने (सीसीआय) जिल्ह्यात नऊ केंद्र प्रस्तावित केले आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला.
सोयाबीनचे जवळपास पावणे दोन लाख हेक्टर तर कापसाचे सुमारे दोन लाख हेक्टर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नुकसानीतून वाचलेले सोयाबीन बाज ारात आणल्यानंतर त्यालाही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. नाफेडने जिल्ह्यात एकही सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केलेले नाही. त्यामुळे सोयाबीनची खरेदी हमीभावाने केव्हा होईल, हा प्रश्न आहे. दुसरीकडे मात्र बाजारात सोयाबीनची आवक सुरू झाली असून सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपये एवढा भाव मिळत आहे.
हमी भावापेक्षा हा भाव खूप कमी आहे. दिवाळीसाठी पैसे मोकळे व्हावे म्हणून बाजारात हाती आलेला माल शेतकरी मिळेल त्या भावात विकत आहे. नाफेडने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात अद्याप केंद्र निश्चित केले नाही. सोयाबीनला ४ हजार ३५० रुपयांचा हमीभाव मागील वर्षी होता. यावर्षी ५ हजार ३२८ रुपयांचा भाव असल्याचे सांगितले जाते, परंतु अधिकृत आदेश आल्याशिवाय भावाबाबत आताच सांगता येत नसल्याचे सांगण्यात आले. अजून जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश नसल्याने जिल्हा पणन महासंघाकडून पुढील आदेशाची प्रतीक्षा केली जात आहे.
नाफेडने जिल्ह्यात मूग, उडीद, मका व सोयाबीनची हमीभावात खरेदी करण्याची तयारी सुरू केली असली तरी बाजारातील परिस्थितीवर खरेदी केंद्रांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. नाफेडकडून खरेदी केंद्राचे नियोजन केले जाणार असले तरी तिकडे शेतकऱ्यांचा माल बाजारात दाखल झाला आहे.
मध्यम सोयाबीनला बाजारात सध्या ३५०० ते ३८०० रुपये आणि चांगल्या मालाला ४ हजार रुपयांपर्यंतचा भाव आहे. मुगाला बाजारात कमाल ५५०० ते ४५०० रुपये व सरासरी ५३०० रुपयांचा भाव आहे. सध्या बाजारात सोयाबीनची आवक बऱ्यापैकी असली तरी भाव मात्र कमी आहे. पैसे मोकळे करण्याच्या प्रयत्नात शेतकरी आहेत.