Jalna Agriculture News : जिल्ह्यात ६१.७६ टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांची पेरणीसाठी धावपळ File Photo
जालना

Jalna Agriculture News : जिल्ह्यात ६१.७६ टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांची पेरणीसाठी धावपळ

खरीप हंगाम : सोयाबीन अन् कापसाचा जोर; काही भागांत दमदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

पुढारी वृत्तसेवा

Sowing completed on 61.76% of land in the district; farmers in a rush to sow

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणावर मात करत शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना गती दिली आहे. कृषी विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत ६१.७६ टक्के पेरणी पूर्ण झाली असून, मागील काही दिवसांत झालेल्या पावसाने पेरणीला मोठा दिलासा मिळाला.

जिल्ह्यात एकूण सरासरी क्षेत्रापैकी ६,५१,१७३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४,०२,१५४ हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे. आगामी काळात पावसाची हीच स्थिती कायम राहिल्यास पेरणीचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. पेरणीची लगबग सुरू असली तरी, शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी आणि पिकांच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभागाच्या सल्ल्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाची स्थिती अशीच अनुकूल राहिल्यास उर्वरित क्षेत्रावरही लवकरच पेरणी पूर्ण होईल, अशी आशा कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील चितळी-पुतळी, डुकरी पिपरी आदींसह परिसरात जोरदार पाऊस न झाल्यामुळे अजूनही पेरण्या खोळंबल्या आहेत. येत्या काळात जोरदार पाऊस झाल्यास तेथील पेरण्या होऊन खरिपाच्या पेरणीची टक्केवारी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सोयाबीन आणि कापसाला पसंती

यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांचा ओढा सोयाबीन आणि कापूस या पिकांकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच मूग, उडीद आणि मका या पिकांचीही पेरणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी शेतकरी वर्गाने विशेष पसंती दर्शवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT