South American common boa snake found in Jalna
जालना, पुढारी वृत्तसेवा : दक्षिण अमेरिकेतील कॉमन बोआ साप जालना शहरात सापडल्याने सर्पमित्रात आश्चर्य व्यक्त होत आहे. हा साप परदेशातून मागविण्यात येणाऱ्या कंटेनरमधून जालन्यातील औद्योगिक वसाहतीपर्यंत आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दक्षिण अमेरिकेत आढळणारा कॉमन बोआ हा साप स्वभावाने अत्यंत शांत व बिनविषारी आहे. मात्र तो अतिविषारी घोणस सापासारखा दिसणारा असल्याने अनेकदा फसगत होते. जालन्यातील सर्पमित्र रामेश्वर शहा यांनी या सापाचे औद्योगिक वसाहतीतून रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला पकडले. व त्यांनतर या सापाला वनपरिक्षेत्र अधिकारी नीता फुले यांच्या स्वाधीन करण्यात आले.
साप बुधवारी आढळून आल्याचा जालना येथील औद्योगिक वसाहतीमध्ये घोणस सारखा दिसण फोन सर्पमित्र रामेश्वर शहा यांना आला होता. त्यांनी तत्काळ औद्योगिक वसाहतीमध्ये जाऊन या सापाला रेस्क्यू केले. दरम्यान, हा साप अत्यंत दुर्मिळ असून तो भारतात सहसा आढळत नाही. कारण या सापाचा मूळ अधिवास हा दक्षिण अमेरिकेतील बेटांवर असल्याचे निरीक्षण सर्पमित्र रामेश्वर शहा यांनी नोंदवले.
त्यांनी या सापाबद्दल माहिती देताना सांगितले की, हा साप अत्यंत शांत स्वभावाचा आणि वजनाने स्थूल आहे. विशेष म्हणजे हा साप बिनविषारी असल्याचे त्यांनी सांगितले. हा छोटा अजगर प्रजातीतील असल्याचेही ते म्हणाले. हा साप तपकिरी रंगांचा असून त्याचा अंगावर वर्तुळाकार ठिबके आहेत.
दुर्मीळ साप
सर्पमित्र रामेश्वर शहा यांनी बुधवारी या सापाला सहायक वनसंरक्षक सुदान मुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी नीता फुले, वनरक्षक बालाजी घुले यांच्या स्वाधीन केले. यावेळी दुर्मीळ साप पाहण्यासाठी नागरीकाची गर्दी झाली होती.