So far, 12 percent sowing has been completed in the district, preparations for the Rabi season have begun.
जालना, पुढारी वृत्तसेवा: सप्टेंबर पासून सुरू झालेला पाऊस दिवसाआड नोव्हेंबर महिन्यार्यंत सुरूच होता. यामुळे शेतातील सोंगून ठेवलेले पौक काढण्यासाठी शेतकऱ्यांना वेळ मिळाला नाही. आता पावसाने थोडी विश्रांती दिल्यामुळे रान गजबजू लागले आहे. शेतातील काडीकचरा गोळा करून, मशागत करून शेत पेरण्यायोग्य करण्याकडे शेतकरीराजा भर देत आहे. आतापर्यंत रब्बी हंगामात केवळ १२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
जालना जिल्हयाचे रब्बी हंगामाचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ११ हजार ८२० हेक्टर इतके आहे. त्यापैकी २६ हजार २३९ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे. ज्याची टक्केवारी १२.३८ इतकी आहे. रब्बी हंगामात आतापर्यंत घनसावंगी तालुक्यात ५ हजार २६८ हेक्टर म्हणजे सर्वाधिक पेरणी झाली आहे. तर सर्वात कमी पेरणी परतूर तालुक्यात झाली आहे. सध्या जिल्ह्यात रान मोकळं करणे, काडी-कचरा काढणे, नांगरट, पेरणी लायक जमीन तयार करणे ही कामे वेगात सुरू आहेत. खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, तूर यांची काढणी आणि मळणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही ठिकाणी शेवटच्या टप्प्यात कापूस तोडणी देखील सुरू आहे.
दरम्यान, जिल्हा कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत फक्त १२ टक्के रब्बी हंगामाचा पिकपेरा पूर्ण झाला आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख २ हजार २५८ इतके आहे. त्यापोटी सुमारे १२ हजार ४०७ क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ८९० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ३ हजार ४५५ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. मकाचे सर्वसाधारण क्षेत्र १४ हजार ४०७ हेक्टर क्षेत्र आहे त्यापैकी १४२६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. तर हरभरा ८ हजार ९५१, इतर कडधान्ये ४९९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा, लसूण, साजूक तूपासाठी चारापिके अशी प्रमुख पिके घेतली जातात. शेतकरी पेरणीपूर्वी जमीन नांगरून खत व्यवस्थापन, बियाणे प्रक्रिया आणि सिंचन सुविधा तपासून घेत आहेत. जमिनीतील ओलावा आणि तापमान लक्षात घेऊनच पेरणी करावी. हरभरा आणि गव्हासाठी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा योग्य मानला जातो. त्यामुळे पुढील काही दिवसांत पिकपेराला गती मिळण्याची शक्यता आहे. यंदा खरीप हंगामात पावसाचा अतिरेक झाल्यामुळे जमिनीतील ओलावा चांगला आहे. त्यामुळे रब्बी पिकांसाठी जमिनीत पुरेसा दम आहे. शेतकऱ्यांनी नियोजनपूर्वक पेरणी केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते.
बीज प्रक्रिया करावी ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही अशा शेतकऱ्यांनी लगेच हरभरा आणि ज्वारीची पेरणी करून घ्यावी. कारण, सध्या जमिनीत ओल आहे. ही पेरणी करताना मात्र, बीज प्रक्रिया करुन घ्यावी. यामुळे बियाणांची उगवण एकसमान आणि जलद होते. रोगांचा धोका कमी होतो. कीटकनाशकांपासून संरक्षण मिळते. हवामान बदलाचा परिणाम कमी होतो.-व्ही. जे. राठोड, तालुका कृषी अधिकारी. जालना.