जालना : जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीक कर्ज वाटप प्रक्रियेला सुरुवात झाली असली, तरी बँक प्रशासनाच्या संथ कारभारामुळे कर्ज वाटपाचा वेग कमालीचा मंदावला आहे. चालू आर्थिक वर्ष 2026-27 साठी जिल्ह्याला 1303.08 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, 30 एप्रिल पर्यंत बँकांना केवळ 32 कोटी रुपयांचे म्हणजेच अवघे 2.5 टक्के कर्ज वाटप करता आले आहे.
ऐन पेरणीच्या तोंडावर कर्ज मंजुरीची गती संथ असल्याने बळिराजा बँक अधिकाऱ्यांच्या उंबरठ्या झिजवत असून, शेतकरी चिंतेत सापडला आहे. मागील वर्ष 2025-26 च्या खरीप हंगामात 1820 कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी बँकांनी 874.49 कोटींचे कर्ज वाटप करत 48 टक्के उद्दिष्ट साध्य केले होते.
यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (जि.म.स.) 58 टक्के, तर ग्रामीण बँकांनी 59 टक्के कामगिरी केली होती. व्यापारी बँकांनी सर्वाधिक 1260 कोटींच्या उद्दिष्टापैकी 545.96 कोटींचे कर्ज वाटप केले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र बँकांची सुरुवात अत्यंत निराशाजनक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
यंदाच्या 2026-27 च्या हंगामात आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेने 200 कोटींच्या उद्दिष्टापैकी केवळ 10.65 कोटी (5.3 टक्के) वाटप केले आहे. तर 783.16 कोटींचे अवाढव्य उद्दिष्ट असलेल्या व्यापारी बँकांनी केवळ 12.31 कोटी (1.6 टक्के) कर्ज वाटप केले आहे.
बँकांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये
ग्रामीण बँकांची स्थितीही वेगळी नसून त्यांनी 319.92 कोटींपैकी अवघे 9.04 कोटी (2.8 टक्के) कर्ज वितरित केले आहे. मृग नक्षत्र अवघ्या काही दिवसांवर आले असून, बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशांची तातडीने गरज आहे. बँकांनी कागदपत्रांची जत्रा कमी करून कर्ज वाटप प्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.