SIT questions Jarange at his home for two hours in connection with ₹500 crore allegation case
अंबड, पुढारी वृत्तसेवा : कथित ५०० कोटी रुपयांच्या व्यवहारासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सार्वजनिक केलेल्या ऑडिओ क्लिपप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) बुधवारी तपासाला वेग दिला. सायंकाळी ७.३० वाजता एसआयटीचे सहा अधिकारी जरांगे यांच्या अंकुशनगर (ता. अंबड) येथील निवासस्थानी दाखल झाले. रात्री ९.३० वाजेपर्यंत तब्बल दोन तास चौकशी करून पथकाने ऑडिओ क्लिप व तिच्या स्रोतासंदर्भात माहिती घेतली. यावेळी जरांगे यांनी संबंधित ऑडिओ क्लिप पेनड्राइव्हमध्ये दिली. पंचांच्या उपस्थितीत त्याचा पंचनामा करून त्यावर जरांगे यांची स्वाक्षरी घेण्यात आली.
चौकशीदरम्यान ऑडिओ क्लिपचा मूळ स्रोत आणि ती आपल्यापर्यंत कशी पोहोचली, याबाबत जरांगे यांनी माहिती दिली. मूळ रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तीने ही क्लिप आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडे दिली आणि त्याच व्यक्तीमार्फत ती आपल्यापर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, क्लिप देणाऱ्या व्यक्तीचे नाव व स्रोत सध्या उघड करणार नसल्याचे स्पष्ट केले. ही क्लिप मिळविण्यासाठी टेलिग्रामचा वापर झाल्याचे सांगितले जात असले, तरी आपल्याकडे टेलिग्राम नसल्याचेही त्यांनी पथकाला सांगितले.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर एसआयटीचे पथक तेथून खाना झाले. त्यानंतर जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधत पथकाला दिलेल्या माहितीचा तपशील सांगितला. ऑडिओ क्लिप सार्वजनिक करण्याच्या अर्धा तास आधी ती आपल्याला मिळाली होती. क्लिप आणून देणाऱ्या व्यक्तीच्याच मोबाइलमध्ये ती आपण ऐकली होती. विशेष म्हणजे, आपण क्लिप ऐकण्याच्या दोन तास आधी ती रामदास कदम यांच्याकडे होती. आपल्याला आणि कदम यांना क्लिप देणारी व्यक्त्ती एकच असावी, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणात कोणालाही वाचवू नये, अशी भूमिका घेत 'मलाही सोडू नका अन् रामदास कदम यांनाही सोडू नका,' असे आपण एसआयटी अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती जरांगे यांनी पत्रकारांना दिली.
काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी पत्रकार परिषदेत कथित ५०० कोटींच्या व्यवहारासंदर्भातील ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली होती. त्यातील संभाषणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती.
ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळणे, संभाषणातील आवाजांची ओळख पटविणे आणि रेकॉर्डिंगचा मूळ स्रोत शोधणे, या दिशेने एसआयटीचा तपास सुरू आहे. पथकात सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक धनवेश पाटील यांच्यासह अन्य अधिकारी सहभागी होते. यावेळी गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुरले उपस्थित होते.
ऑडिओ क्लिपच्या मूळ स्रोताचा शोध महत्त्वाचा
ऑडिओ क्लिप कोणी रेकॉर्ड केली, ती कोणाकडून कोणाकडे पोहोचली आणि रामदास कदम यांच्यापर्यंत ती कशी गेली, याचा शोध घेणे एसआयटीसमोर महत्त्वाचे आव्हान आहे. क्लिपची तांत्रिक तपासणी आणि आवाजांची पडताळणी झाल्यानंतर तपासाची पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.