Silk Production : रेशीम उत्पादनाला मिळाली 'जालनाई ब्रँड' ची ओळख file photo
जालना

Silk Production : रेशीम उत्पादनाला मिळाली 'जालनाई ब्रँड' ची ओळख

रेशीम कोष बाजारपेठेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार

पुढारी वृत्तसेवा

Silk production gains 'Jalnai Brand' identity

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालन्यातील महिलांनी रेशीमपासून साडी विणकाम सुरू केले असून त्यांचे कौशल्य आणि तयार होणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता उल्लेखनीय आहे. पैठणीला जशी स्वतंत्र ओळख मिळाली, त्याच धर्तीवर पालकमंत्री पकंजा मुंडे यांनी सुचविल्यानुसार जालन्यात तयार होणाऱ्या सिल्कच्या उत्पादनांना 'जालनाई' या स्वतंत्र बँडने ओळखले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. १४ रोजी केली. यावेळी त्यांच्या हस्ते 'जालनाई' बॅन्ड लोगोचे विमोचन करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री संजय सावकारे, लोकसभा सदस्य कल्याण काळे, जालना महानगर पालिकेच्या महापौर वंदना मगरे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, आमदार हिकमत उढाण, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार विलास खरात, वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव शैला ए., छत्रपती संभाजीनगर, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, रेशीम संचालनालय संचालक नागपूर विनय मुन, पोलीस महानिरीक्षक विरेंद्र कुमार मिश्र, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया, महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, पोलीस अधिक्षक तेघबीरसिंग संधु यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की या महिलांना अधिक प्रशिक्षण, कौशल्यविकास आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास रेशीम वस्त्रनिर्मितीला मोठी चालना मिळू शकते. जालना जिल्ह्याची ओळख आता 'सिल्क, सीड आणि स्टील' अर्थात 'ट्रिपल एस सिटी' म्हणून निर्माण झाली असून, रेशीम उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यात नव्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.

कापूस आणि सोयाबीन या पारंपरिक नगदी पिकांना पर्याय म्हणून रेशीम शेतीला प्रोत्साहन देतानाच उत्पादनापासून प्रक्रिया, वस्त्रनिर्मिती, ब्रडिंग आणि बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी जालन्यात विकसित करण्यावर शासनाचा भर आहे. ज्याप्रमाणे पैठणी साडी जगप्रसिद्ध आहे, त्याच धर्तीवर स्थानिक महिलांच्या कौशल्याच्या जोरावर 'जालना सिल्क' ला देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठा बँड म्हणून विकसित केले जाईल असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जालना जिल्ह्यातील रेशीम शेती व उद्योगातील संधीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती सादर केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत रेशीम उत्पादक शेतकरी आणि रेशीम खरेदी करणारे व्यापारी यांच्यातला पहिला रेशीम कोष लिलाव करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते घंटानाद करून पहिला रेशीम कोष लिलाव प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घनसावंगी तालुक्यातील शेतकरी भागवत पंडीतराव भानुसे आणि. भाऊसाहेब दत्ता निवदे यांचा सपत्नीक सत्कार केला. अधिकारी, कर्मचारी, शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

उत्पादनापासून वस्त्रनिर्मितीपर्यंत संपूर्ण मूल्यसाखळी

केवळ रेशीम उत्पादन करून उपयोग नाही, तर त्यापुढील प्रक्रिया, धागानिर्मिती, वस्त्रनिर्मिती, साडी विणकाम, ब्रडिंग आणि बाजारपेठ अशी संपूर्ण मूल्यसाखळी उभारणे महत्त्वाचे आहे. जालन्यात या दिशेने विविध प्रयोग सुरू आहेत. स्थानिक पातळीवर रेशीम वस्त्रनिर्मितीला चालना मिळाल्यास शेतकरी, महिला, विणकर, व्यापारी आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT