Jalna News : पाण्या अभावी ऊसाच्या वजनात झाली मोठी घट file photo
जालना

Jalna News : पाण्या अभावी ऊसाच्या वजनात झाली मोठी घट

ऊस पिकालाही दुष्काळाच्या झळा, तोडणी सुरू, कारखाना लवकर सुरू झाल्याने दिलासा

पुढारी वृत्तसेवा

Significant reduction in sugarcane weight due to lack of water

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः घनसावंगी तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकांपाठोपाठ शेतकऱ्यांच्या आर्थिक आधाराचा ऊसही दुष्काळाच्या कचाट्यात सापडला आहे. तालुक्यात ऊस तोडणीला सुरुवात झाली असून, पाण्याअभावी उसाची वाढ खुंटल्याने कांड्यांची जाडी आणि उंची कमी राहिली आहे. परिणामी तोडणी सुरू होताच उसाच्या वजनात मोठी घट जाणवू लागली आहे. वर्षभर मोठा खर्च करून जोपासलेल्या उसातून अपेक्षित उत्पादन मिळण्याची आशा धूसर झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मात्र, साखर कारखाने यंदा तुलनेने लवकर सुरू झाल्याने ऊस वेळेत गाळपासाठी पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

हंगामाच्या सुरुवातीला पावसाने काही प्रमाणात साथ दिल्याने उसाची वाढ चांगली होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने परिस्थिती बदलली. जमिनीतील ओलावा कमी झाला. विहिरी, बोअरवेल तसेच अन्य पाणीस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने अनेक शेतकऱ्यांना उसाला गरजेनुसार पाणी देणे शक्य झाले नाही. परिणामी उसाची वाढ खुंटली असून, त्याचा थेट परिणाम आता वजनावर दिसून येत आहे.

उसाचे पीक उभे करण्यासाठी मशागत, बेणे, लागवड, खते, औषध फवारणी, मजुरी आणि पाणी यावर मोठा खर्च करावा लागतो. वर्षभराच्या या खर्चानंतर उसातून चांगले उत्पादन मिळेल आणि आर्थिक भार हलका होईल, अशी अपेक्षा असते. मात्र, यंदा दुष्काळामुळे उसाची अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पादनाचे गणित बिघडले आहे.

तोडणी सुरू झाल्यानंतर या नुकसानीची प्रत्यक्ष जाणीव शेतकऱ्यांना होत आहे. क्षेत्र तेच असले तरी वजन कमी मिळत असल्याने एकरी उत्पादनावर परिणाम होणार आहे. उत्पादन खर्चात फारशी कपात झालेली नसताना उत्पादनात घट होणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

खरीप हंगामानेही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक धक्का दिला आहे. सोयाबीन, कापूस यासह अन्य पिकांना पावसाअभावी फटका बसला आहे. खरीप पिकांतून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांची भिस्त उसाच्या उत्पन्नावर होती. मात्र, आता उसालाही दुष्काळाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दुष्काळी परिस्थितीत ऊस शेतात उभा ठेवून आणखी वाढीची प्रतीक्षा करणेही धोक्याचे ठरत आहे. पाण्याची उपलब्धता नसल्याने वाढ खुंटलेल्या उसाचे वजन पुढे आणखी घटण्याची शक्यता आहे.

शासनाने मदत द्यावी

दुष्काळग्रस्त ऊस उत्पादकांच्या नुकसानीकडे शासनाने गांभीर्याने पाहून त्यांना आवश्यक मदत व दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. कारखाने लवकर सुरू झाल्याने ऊस गाळपाचा मार्ग मोकळा झाला असला, तरी दुष्काळाने उसाच्या वजनावर घातलेला घाला शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला मोठा धक्का देणारा ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT