Shivani Shinde's song 'Gavlan' goes viral
जालना, पुढारी वृत्तसेवा : रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाणी घेऊन येते आणि तुला लोण्याचा गोळा खायला देते, ही शिवानी शिंदेने गायिलेली गवळण नेटकऱ्यांना भुरळ पाडत आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असल्याचे पहायला मिळत आहे.
शिवानी रामदास शिंदे ही मूळ जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील हातडी येथील रहिवासी आहे. आळंदी देवाची येथील राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेत इयत्ता सातवीमध्ये ती शिक्षण घेत आहे. सध्या आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत.
यात विविध वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. हे विद्यार्थी कीर्तन, भजन आणि विठ्ठलाचा जयघोष करीत तल्लीन होताना दिसत आहेत. आळंदी ते पंढरपूर मार्गावर आयोजित प्रदर्शनात राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलीही सहभागी झाल्या होत्या.
यावेळी संस्थाचालक हभप स्वरांजली हिंगे यांनी शिवानीला एक गवळण गाण्यास सांगितली. यावेळी रिमझिम पाऊस सुरू होता. त्यामुळे अंगात रेनकोट घालून कशाचीही तमा न करता भरपावसात शिवानीने रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाणी घेऊन येते आणि तुला लोण्याचा गोळा खायला देते ही गवळण गायली. यावेळी दिंडीतील एका व्यक्तीने शिवानीचा व्हिडीओ काढून २३ जून रोजी सोशल मीडियावर टाकला. तिचा आवाज सुमधुर असल्यामुळे हा व्हिडीओ क्षणातच प्रचंड व्हायरल झाला असून, आज लाखोंमध्ये लाइक्स मिळत आहेत.
माझ्या आजी-आजोबांपासून परमार्थाचा वारसा लाभलेला आहे. सध्या माझे वडील रामदास शिंदे दिंडीत सहभागी झाले आहेत. मी राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेत इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असून, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीत सहभागी झाले असून, हा आम्हाला लाभलेला वारकरी संप्रदायाचा वारसा कायम पुढे जपणार आहे.-शिवानी रामदास शिंदे, हातडी, ता. घनसावंगी, जि. जालना.