जालना

Jalna News : सावरखेडा-वरखेडा विरो रस्त्याची झाली दुरवस्था

चार वर्षापासून या रस्त्याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

Sawarkheda-Warkheda Viro road is in a bad condition

मुकेश भारद्वाज

जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील सावरखेडा-वरखेडा विरो हा मुख्य रस्ता गेल्या चार वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठ-मोठ्या खड्यांमुळे हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या मार्गाचा वापर दररोज शेकडो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण तसेच जाफराबाद शहरात शिक्षण व इतर कामांसाठी ये-जा करणारे नागरिक करतात. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला असून, पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे.

या रस्त्यावर अनेक किरकोळ अपघात घडले असून, भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने देऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अन्यथा आंदोलन

सावरखेडा-वरखेडा विरो रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सावरखेडा-वरखेडा विरो हा रस्ता गेल्या चार वर्षांपासून अतिशय खराब अवस्थेत आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. पावसामुळे खड्ड्यांची स्थिती आणखी गंभीर झाली असून, मोठी दुर्घटना होण्यापूर्वी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी.
आकाश उबाळे, ग्रामस्थ, वरखेडा विरो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT