भोकरदन ः जवखेडा ठोंबरे येथे पूर्णा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियावर छापा मारून भोकरदनच्या महसूल विभागाच्या पथकांनी त्यांचा पाठलाग करून ट्रॅक्टर जेसीबी जप्त केले, मुजोर वाळूमाफिया अधिकाऱ्यांशी वाद घालत कारवाई करताल व जपत्या करतात तर तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या महसूल पथकातील अधिकाऱ्यांना दिल्या मात्र महसूल अधिकाऱ्यांनी ही त्यांच्यावर कारवाई केली व वाहने जप्त केली या प्रकरणात जवखेडा ठोंबरे येथील नऊ जनाविरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकरदन महसूल विभागाला दिनांक 14 रोजी गुप्त खबरेद्वारे माहिती मिळाली की जवखेडा ठोंबरे येथे पूर्णा नदीचा पात्रातून सात ते आठ व्यक्ती जेसीबी व ट्रॅक्टर सह वाळू उपसा करत आहे माहितीची खात्री करून भोकरदन महसूल विभागाचे अधिकारी त्यांचे सर्व पथक मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी संपूर्ण ताफ्यासह गेले असता त्यांना नदीपात्रातून सर्व वाळूमाफिया वाहन चालक हे संघटितपणे वाळू उपसा करत असल्याचे दिसून आले.
त्यांनी त्यांना रोखून कारवाई करण्याची सुरू केले असता वाळू माफियांनीच अधिकाऱ्यांना धमकावणे सुरू केले वादीवाद झाले तुम्ही आमची वाहने जप्त करतात व कारवाई करतात तुम्हालाच गंभीर परिणाम भोगावे लागतील धमक्या देणे सुरू केले. अधिकाऱ्यांना दहशत व भीती निर्माण होईल यासाठी त्यांच्या गाड्या समोरच वाहने आडवी लावली.
अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून व त्यांना न जुमानता काही वाळू माफियांना पकडले व काही वाळू माफिया अधिकाऱ्यांच्या तावडीतून सुटून पळून जाऊ लागले. तेव्हा त्यांचा पाठलाग करण्यात आला.
महसूल अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मिळून पकडलेला एक ट्रॅक्टर भोकरदन येथे पोलिस ठाण्यात आणून लावण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे महसूलच्या पथकातून पळून गेलेला जेसीबी जाफराबादच्या महसूल पथकाने पकडून तोही टेंभुर्णी येथील पोलिस स्टेशनमध्ये जप्त करून ठेवलेला आहे.
तलाठी अविनाश चव्हाण यांनी दिली तक्रार
याप्रकरणी कुंभारीचे ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी अविनाश चव्हाण यांनी दिनांक 17 मंगळवारी भोकरदन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून भोकरदन पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणारे व त्यांना मदत करणारे असे आरोपी, गजानन ठोंबरे, परमेश्वर ठोंबरे ,जगदीश ठोंबरे ,राम विलास ठोंबरे, रवी ठोंबरे ,राजेंद्र सहाणे, विजय ठोंबरे, कृष्णा ठोंबरे, सोमीनाथ ठोंबरे, सर्व राहणार जवखेडा ठोंबरे यांच्या विरुद्ध अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी व शासकीय कामात अडथळा आणणे धमक्या देऊन अधिकाऱ्यांनी जप्त केलेली वाहने पळवणे यासह विविध कलमांद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.