अंबड ः अंबड तालुक्यातील चांभारवाडी शिवारातील दुधना नदीपात्रातून अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या महसुलच्या पथकास शिवीगाळ करीत वाळूमाफियाने ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे महसुलच्या पथकात खळबळ उडाली आहे.
अंबड तालुक्यातील दुधना नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूलच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रोहित संजय जगताप याच्यासह त्याचे इतर साथीदार अवैधपणे वाळूचे उत्खनन करून वाहतूक करताना आढळून आले. पथकाने त्यांना थांबवून अधिकृत परवान्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणताही परवाना आढळून आला नाही.
पथकाने कायदेशीर कारवाई करण्यासाठी वाळूने भरलेले ट्रॅक्टर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी रोहित जगताप याने पथकातील अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत व शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि जबरदस्तीने वाळूने भरलेले ट्रॅक्टर घटनास्थळावरून पळवून नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित संजय जगताप हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही त्याच्यावर अवैध वाळू उपसा प्रकरणी अंबड तहसील कार्यालयामार्फत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू असतानाही, कायद्याची भीती न बाळगता त्याने पुन्हा हा गंभीर गुन्हा केला आहे.
रोहित जगताप याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैध वाळूमाफिया आणि शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या गुंडांची गय केली जाणार नाही, असा इशारा यावेळी तहसिलदार विजय चव्हाण यांनी दिला. भविष्यात त्यांच्यावर एमपीडीए किंवा तडीपारीसारखी कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असेही त्यांनी सांगीतले.
यांनी केली कारवाई
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तलाठी स्वप्नील खरात श्याम विभूते,रमेश वालेकर विकास डोळसे, गोपाळ गाडेकर यांनी ही कारवाई केली.