समृद्धी महामार्गावर गॅस गळती; जालना हद्दीत वाहतूक ठप्प pudhari photo
जालना

Samruddhi Expressway gas leak : समृद्धी महामार्गावर गॅस गळती; जालना हद्दीत वाहतूक ठप्प

७ ते ८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; दक्षता म्हणून वाहतूक वळवली

पुढारी वृत्तसेवा

जालना : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर सोमवारी (दि.६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गॅस गळतीची मोठी घटना घडली. जालना हद्दीतील एक्झिट पॉइंट परिसरात ही गळती झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षेच्या कारणास्तव महामार्ग पोलिसांनी तातडीने दखल घेत वाहतूक थांबवल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, गॅस वाहून नेणाऱ्या टँकरमधून गळती सुरू झाल्याचे लक्षात येताच महामार्ग पोलिसांनी तत्परता दाखवली. कोणताही अनर्थ घडू नये यासाठी संबंधित परिसर तातडीने सील करण्यात आला. आपत्कालीन यंत्रणा आणि अग्निशमन दलाला पाचारण करून गळती रोखण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. पोलिसांच्या या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी वाहनचालकांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर मंगळवारी दुपारनंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यास सुरुवात झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वाहतुकीचा खोळंबा; प्रवाशांचे हाल

गॅस गळतीमुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक इतर पर्यायी मार्गावर वळवण्यात आली. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेली ही कोंडी मंगळवारी (दि.७) देखील कायम होती. जालना इंटरचेंज परिसरात वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. भर उन्हात तासंतास अडकून पडल्याने प्रवाशांचे आणि वाहनचालकांचे हाल झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT